लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात शेतकऱ्यांच्या समस्या व शेतीमालाच्या दराचा मुद्दा चर्चेत आला आहे. सोयाबीनचे दर गेल्या काही महिन्यापासून चांगलेच घसरले असून शेतकरी अडचणीत आले आहेत. यामुळे विरोधकांनी ऐन लोकसभा निवडणुकीत हा मुद्दा लावून धरला आहे. त्यातच धाराशीवमध्ये सभेत बोलताना पंतप्रधान मोदींनी सोयाबीन दराचा मुद्दा उपस्थित करत गेल्या १० वर्षातील व काँग्रेसच्या काळातील दर जाहीर केले.
आता राज्य सरकारकडून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करत दिलासा दिला आहे. राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडेंनी (Dhananjay munde) ही घोषणा केली आहे.
लातूरमधील भाजपाचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांच्या प्रचार सभेसाठी धनंजय मुंडे यांची अहमदपूर येथे सभा झाली. त्या सभेत त्यांनी शेतकऱ्यांना पैसे देण्याची घोषणा करून त्यांना मोठा दिलासा दिला आहे. मात्र निवडणूक काळात आचारसंहिता लागू असल्याने राजकीय पक्षांना व नेत्यांना कुठलीही मोठी घोषणा करता येत नाही. मतदारांना आमिष दाखवून मते मागता येत नाही. मात्र कृषीमंत्री धनंयज मुंडे यांनी जाहीर सभेत ही घोषणा केल्याने आता विरोधी पक्षनेते यावर काय भूमिका घेतात हे पाहणे उत्सुकता आहे.
कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी हेक्टरी पाच हजार रुपये देणार असल्याची घोषणा केली. त्याचबरोबर त्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्याची तारीखही सांगून टाकली. १२ जूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर सोयाबीनचे पैसे जमा केले जाणार आहेत. खरीपातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना साडे चार हजार कोटी रुपयांचे पेकेज सरकारने जाहीर केले आहे. या पॅकेजच्या माध्यमातून सोयाबिन उत्पादक शेतकऱ्यांसाठी हेक्टरी ५ हजार रुपये देण्यात येणार आहेत, अशी घोषणा धनंजय मुंडेंनी लातूरमध्ये केली.
बीडमध्ये एका कारमध्ये तब्बल १ कोटी रुपयांची रोकड सापडल्याने खळबळ उडाली आहे. गेवराई तालुक्यातील चेकपोस्टवर शनिवारी रात्री ही रक्कम सापडली आहे. रोख रक्कम सापडलेल्या कारचालकाकडे कोणतेही कागदपत्रे नव्हती. तेसच रोख रकमे बाबत देखील समाधान कारक उत्तरे दिली नाही. त्यामुळे पोलिसांचा संशय वाढला असून एवढे मोठे पैसे कुठून आले? ते कुणाचे आहेत याचा शोध पोलिस घेत आहेत.