Karuna Munde on Family Court Verdict : करुणा शर्मा यांना धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नीचा दर्जा देतानाच त्यांना महिन्याला २ लाख रुपयांची पोटगी देण्याचे आदेश मुंबईतील वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयानं आज दिले. मात्र, न्यायालयाच्या या आदेशाला करुणा मुंडे उच्च न्यायालयात आव्हान देणार आहेत.
करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार केली होती. धनंजय मुंडे हे माझे पती असून त्यांनी मला पोटगी द्यावी अशी मागणीही त्यांनी केली होती. न्यायालयानं ती मान्य केली व धनंजय मुंडे यांनी दरमहा २ लाखांची पोटगी द्यावी असे आदेश दिले.
कौटुंबिक न्यायालयाच्या निकालानंतर करुणा मुंडे अधिकच आक्रमक झाल्या आहेत. पत्रकारांशी बोलताना त्यांनी पोटगीची रक्कम १५ लाख मिळावी अशी मागणी केली आहे. त्यासाठी उच्च न्यायालयात जाणार असल्याचं म्हटलं आहे. ‘माझी दोन्ही मुलं माझ्यासोबत राहतात. आम्हा तिघांना प्रत्येकी ५ लाख रुपये मिळायला हवेत. मी १ लाख ७० हजार रुपये घराचे हफ्ते भरते आहे. ३० हजार रुपये घराचा मेन्टेनन्स आहे. मुलगा बेरोजगार आहे. दोन लाखांत आम्ही काय करणार, यासाठीच मी हायकोर्टात जाणार आहे, असं करुणा मुंडे यांनी सांगितलं.
'गेली तीन वर्षे पोटगीसाठी लढत आहे, मला किती त्रास झाला हे मी सांगू शकत नाही. मंत्र्यासोबत माझं भांडण झालं. माझ्या वकिलानं एक रुपया घेऊन ही केस कोर्टात दाखल केली. आज आम्ही जिंकलो. हा सत्याचा विजय आहे, माझ्यासोबत एक साधा वकील होता जो सत्यासोबत होता. मला न्याय मिळाला, असं करुणा मुंडे म्हणाल्या.
खंडणीच्या गुन्ह्याखाली अटक असलेला धनंजय मुंडे यांचा विश्वासू वाल्मिक कराड याच्यावरही करुणा मुंडे यांनी आरोप केले. 'वाल्मिक कराडसारख्या दोन कवडीच्या गुंडानंही मला मारहाण केली होती. माझ्या गालाला आणि नको त्या ठिकाणी स्पर्श केला. एका मंत्र्याच्या बायकोला त्यानं मारहाण केली. कलेक्टर, पोलीस महासंचालक आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडं मी तक्रार केली होती. सीसीटीव्ही फूटेज मागितलं होतं, पण आजपर्यंत ते मला मिळालं नाही, असा आरोपही करुणा मुंडे यांनी केला.
'माझ्यावर खूप दबाव आहे. पूर्वीही होता आताही आहे. माझे घाणेरडे व्हिडिओ काढून प्रसारित करू अशा धमक्या दिल्या जातात, पण आता मी कोणाला भीत नाही. काय करायचं ते करा, मी न्यायासाठी लढणार, असं करुणा मुंडे म्हणाल्या. महिलांनी कुठल्याही अत्याचाराला घाबरून गप्प बसू नये, बिनधास्त पुढं येऊन लढावं, असं आवाहनही त्यांनी केलं.
संबंधित बातम्या