गुवाहाटी शहरात नियमित गस्त घालत असताना डिलिव्हरी बॉयला मारहाण केल्याप्रकरणी पानबाजार पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. आसामचे पोलिस महासंचालक जी. पी. सिंह यांनी सांगितले की, पानबाजार पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी निरीक्षक भार्गव बोरबोरा यांना तात्काळ निलंबित करण्यात आले असून या घटनेच्या विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
कॉटन युनिव्हर्सिटीचा विद्यार्थी असलेला फूड डिलिव्हरी बॉय शुक्रवारी रात्री चुकून नो एन्ट्री झोनमध्ये घुसला. यामुळे पोलीस अधिकाऱ्याने त्याला मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला. निरीक्षक भार्गव बोरबोरा ओसी पानबाजार यांचे वर्तन अमान्य आहे. त्यांना तात्काळ निलंबित करण्यात आले असून विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत', अशी माहिती डीजीपींनी 'एक्स'वर दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तीने सिग्नल ओलांडून वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. यानंतर पोलीस अधिकाऱ्याने डिलिव्हरी बॉयचा पाठलाग केला. तसेच काही अंतरावर गेल्यावर त्याला पकडून बेदम मारहाण केली. त्यानंतर घटनास्थली गर्दी झाली, तेव्हा संबंधित पोलीस अधिकाऱ्याने लोकांना जाण्यास सांगितले. मात्र, तिथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने या घटनेचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. या घटनेचा व्हिडिओ डीजीपर्यंत पोहोचल्यानंतर संबंधित पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये संबंधित पोलीस अधिकारी डिलिव्हरी बॉयचा गळा पकडून त्याला मारहाण करतानातसेच अपशब्द वापरताना दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर लोकांनी यावर कारवाई करण्याची मागणी केली.