मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Devendra Fadnavis : बळीराजाला त्रास देवू नका, घरी पाठवेन; फडणवीसांचा अधिकाऱ्यांना सज्जड इशारा

Devendra Fadnavis : बळीराजाला त्रास देवू नका, घरी पाठवेन; फडणवीसांचा अधिकाऱ्यांना सज्जड इशारा

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Sep 01, 2023 08:27 AM IST

Devendra Fadnavis : शेतकऱ्यांना वीजपुरवठा होत नसल्याच्या घटना समोर आल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त केला आहे.

Maharashtra Deputy Chief Minister Devendra Fadnavis
Maharashtra Deputy Chief Minister Devendra Fadnavis (Jitender Gupta)

Devendra Fadnavis On Mahavitaran Officer : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाने दडी मारली आहे. परिणामी बळीराजा संकटात सापडला आहे. त्यामुळं शेतकरी विहिरी तसेच बोअरमधील पाण्याच्या सहाय्याने पीकं वाचण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु सध्या राज्यातील अनेक भागांमध्ये सतत वीजपुरवठा खंडीत होत असल्याच्या घटना समोर येत आहे. त्यामुळं आता हे प्रकरण थेट मंत्रालयात पोहचलं असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वीज पुरवठ्याच्या मुद्द्यावर गंभीर दखल घेण्यात आली आहे. वीज पुरवठा खंडीत करून बळीराजाला विनाकारण त्रास देवू नका, नाही तर तुम्हाला थेट घरी पाठवेन, असा सज्जड दम फडणवीसांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना भरला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यात गेल्या एका महिन्यापासून पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळं जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पीकं करपण्यास सुरुवात झाली आहे. हातची पीकं जाण्याची वेळ आल्यानं शेतकऱ्यांसमोर जगण्या-मरण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. परंतु विहीरी आणि बोअरच्या पाण्यावर पीकं जगवण्याचा संघर्ष बळीराजाकडून सुरू आहे. मात्र महावितरण कंपनीकडून सातत्याने वीज पुरवठा खंडित करण्यात येत आहे. त्यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी आमदार अभिमन्यू पवार यांच्या कानावर ही गोष्ट घातली. त्यानंतर आमदार पवार यांनी बैठकीतूनच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन लावला. त्यानंतर फडणवीस यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावत तातडीने वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना केल्या.

शेतकऱ्यांसमोर आमदार अभिमन्यू पवार यांनी फडणवीसांना फोन केला होता. त्याचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. औसा मतदारसंघातील आमदार अभिमन्यू पवार हे पूर्वी देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक होते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी कॉंग्रेसचे दिग्गज नेते बसवराज पाटील यांचा पराभव करत औसामध्ये भाजपचा झेंडा फडकावला होता. अभिमन्यू पवार यांची फडणवीस यांच्याशी असलेल्या जवळीकीमुळं वीज प्रश्न मार्गी लागल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केलं जात आहे.

WhatsApp channel