New CM Devendra Fadnavis : देवेंद्र फडणीवस यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  New CM Devendra Fadnavis : देवेंद्र फडणीवस यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

New CM Devendra Fadnavis : देवेंद्र फडणीवस यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

Dec 05, 2024 09:36 PM IST

CM Devendra Fadnavis : मुंबईत आझाद मैदान येथे एका भव्य समारंभात भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज महाराष्ट्राच्या २१व्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

देवेंद्र फडणवीस यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ
देवेंद्र फडणवीस यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

मुंबईत आझाद मैदानावर आयोजित भव्य शपथविधी सोहळ्यात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी तिघांना शपथ दिली. यावेळी पतंप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय रस्ते वाहतूक खात्याचे मंत्री नितीन गडकरी, अर्थमंत्री निर्मला सितारामण तसेच विविध राज्याचे मुख्यमंत्री आणि एनडीएचे घटक पक्षाचे नेते उपस्थित होते.

शाहरुख-सलमान-सचिन ठरले सोहळ्याचे आकर्षण

देवेंद्र फडणवीस यांनी आज तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी देशभरातून एनडीएचे नेते मुंबईत दाखल झाले होते. यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व सरमा, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान, सोहळ्याला उपस्थित होते. 

शपथविधी सोहळ्याला बॉलिवूड कलावंतांनाही आमंत्रित करण्यात आले होते. यात प्रामुख्याने अभिनेता शाहरुख खान, सलमान खान, संजय दत्त, रणबीर कपूर, रणवीर सिंह यांची खास उपस्थिती होती. तसेच क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर सपत्निक उपस्थित होता. उद्योगजगतातून रिलायन्स समूहाचे मुकेश अंबानी, त्यांचे बंधू अनिल अंबानी, एचडीएफसीचे दीपक पारेख शपथविधीला उपस्थित होते.

एकनाथ शिंदे यांनी उच्चारले बाळासाहेब ठाकरे, मोदी आणि शाहांचे नाव

आज झालेल्या शपथविधी सोहळ्यात फक्त तीन नेत्यांचा शपथविधी पार पडला. देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीनंतर एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर सर्वात शेवटी अजित पवार यांनी शपथ घेतली. शपथ घेण्यापूर्वी शिंदे यांनी शिवसेनेचे संस्थापक, दिवंगत बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे नाव उच्चारून शपथेला प्रारंभ केल्याचे दिसून आले. यावेळी नेमकी कधी शपथ सुरू करायची याबाबत राज्यपाल महोदय काही थांबून राहिले होते. राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले.

मविआ नेत्यांची शपथविधी सोहळ्याकडे पाठ

दरम्यान, या सोहळ्याचा राज्यातील विरोधी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार, शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिले. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना फोन करून निमंत्रण दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर