राम मंदिर आंदोलनादरम्यान अयोध्येमध्ये बाबरीचा ढाचा पाडताना आपण तेथे होतो, या फडणवीसांच्या विधानाची उद्धव ठाकरेंनी अनेकदा खिल्ली उडवली होती. त्यांच्या वजनानेच बाबरी पडली असेल असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. मात्र आता देवेंद्र फडणवीस यांनी ३० वर्षांपूर्वी कारसेवेसाठी अयोध्येला गेल्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यावेळच्या वर्तमानपत्रात छापून आलेला एक फोटो फडणवीस यांनी शेअर केला आहे. नागपूरहून अयोध्येला जाणाऱ्या कारसेवकांची रेल्वे स्टेशनवर मोठी गर्दी उसळली आहे. त्या गर्दीत फडणवीस दिसत आहेत.
फडणवीस म्हणाले होते की, पहिल्या कारसेवेला २० व्या वर्षी गेलो होतो. त्यावेळी बदायूच्या जेलमध्ये १८ दिवस काढले होते. दुसऱ्या कारसेवेच्यावेळी जेव्हा कलंकित ढाचा खाली आला तेव्हा मी तिथेच होतो, असे फडणवीसांनी आपल्या भाषणादरम्यान सांगितले होते. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना तिसऱ्यांदा कारसेवा झाली तेव्हाही मी तेथेच होतो. कारण मी कारसेवक आहे, राम सेवक आहे, असे फडणवीस यांनी अनेकदा सांगितले आहे. याचा पुरावा फडणवीसांनी समोर आणला आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नुकतेच एक ट्वीट केले आहे. यात त्यांनी नागपूरहून प्रकाशित होणार्या एका वृत्तपत्राचे आभार मानले आहेत. अयोध्येला जाणार्या कारसेवकांची नागपूर रेल्वे स्थानकावर गर्दी उसळली, तेव्हाचे हे छायाचित्र त्यांनी शेअर केले आहे. छायाचित्रकार शंकर महाकाळकर यांनी ते टिपले असल्याचे फडणवीसांनी सांगितले आहे.
अयोध्येत प्रभूश्रीरामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा होत असताना या छायाचित्राच्या माध्यमातून जुन्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळाल्याचे फडणवीस आपल्या ट्विटमध्ये म्हणाले.
संबंधित बातम्या