मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Economy : महाराष्ट्राच्या १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेसाठी ‘रोडमॅप-२०३५’ तयार – देवेंद्र फडणवीस

Maharashtra Economy : महाराष्ट्राच्या १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेसाठी ‘रोडमॅप-२०३५’ तयार – देवेंद्र फडणवीस

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Mar 06, 2024 11:58 PM IST

Maharashtra Trillion Dollar Economy : महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी करण्यासाठी ‘महाराष्ट्र२०३५’हा रोड मॅप तयार केला आहे. याद्वारे महाराष्ट्र हे देशात अग्रस्थानी राहणार असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले,

देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा, उद्योगस्नेही वातावरण व धोरणांमुळे गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात अव्वल आहे. राज्यात आर्थिक सल्लागार परिषदेची स्थापना करण्यात आली असून या परिषदेने महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी करण्यासाठी ‘महाराष्ट्र २०३५’ हा रोड मॅप तयार केला आहे. याद्वारे महाराष्ट्र हे देशात अग्रस्थानी राहणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.

इंडिया ग्लोबल फाउंडेशनच्या वतीने आयोजित नेक्स्ट टेन – वार्षिक गुंतवणूक परिषदेच्या (अन्युअल इन्व्हेस्टमेंट समिट) कार्यक्रमात द महा ग्लोबल स्टोरी @75 या सत्रात उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांची मुलाखत झाली. यावेळी त्यांनी महाराष्ट्रात होत असलेल्या पायाभूत सुविधा, त्यामुळे येणारी गुंतवणूक व उद्योग यांची माहिती दिली. एडीटोरीजचे संस्थापक विक्रम चंद्रा यांनी फडणवीस यांची मुलाखत घेतली.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सन २०३५  मध्ये महाराष्ट्र राज्य स्थापनेला ७५ वर्षे होत आहेत. यानिमित्ताने आम्ही एक व्हिजन तयार करत आहोत. सुरक्षितता, मजबूत, सामाजिक पायाभूत सुविधा, गुंतवणूक आणि शाश्वतता यावर लक्ष केंद्रीत करत आहोत. यामुळे राज्याला ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेने पुढे नेण्यास मदत होत आहे. डॉईश्च बँकेने जाहीर केलेल्या गुंतवणूकविषयक अहवालात नमूद केल्यानुसार, सन २०२९ पर्यंत देशातील मोठ्या पायाभूत सुविधांमध्ये होणाऱ्या एकूण गुंतवणुकीपैकी ५० टक्के गुंतवणूक ही राज्यात होणार आहे. विकासाची प्रक्रिया गतिमान करण्यासाठी पायाभूत सुविधा आवश्यक असून त्याबरोबरच राज्यात शाश्वत विकासावर भर देण्यात येत आहे.

सामाजिक पायाभूत सुविधांचा विचार करता राज्यात सर्वाधिक विद्यापीठे असून नॅक नामांकन असलेल्या सर्वाधिक संस्था राज्यात आहेत. आयआयटी, आयआयएम आहेत, सर्वाधिक खासगी वैद्यकीय व अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत. आरोग्य क्षेत्रातही व्यापक बदल होत असून पुढील काही वर्षात राज्यात ५०हजार बेडची व्यवस्था करण्यात येणार आहे. मात्र, सुमारे १लाख बेड तयार करण्याचे आमचे नियोजन आहे. शाश्वत विकास करत असताना हरित ऊर्जा, पुनर्वापर अर्थव्यवस्था या क्षेत्रावर जास्त लक्ष केंद्रीत करत आहोत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

गुंतवणुकीला आकर्षित करण्यासाठी राज्यांमधील स्पर्धेचे स्वागत करताना उपमुख्यमंत्र्यांनी भारताच्या आर्थिक विकासात महाराष्ट्र आघाडीवर असल्याचे प्रतिपादन यावेळी केले. ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेने महाराष्ट्राची वाटचाल सुरू आहे. राज्य शासन राबवित असलेल्या धोरणांमुळे गुंतवणूकदारांचा या राज्यावर विश्वास आहे. देशातील २०टक्के स्टार्टअप व २५ टक्के युनिकॉर्न हे राज्यात असून महाराष्ट्र हे देशाची स्टार्टअप कॅपिटल आहे. त्यामुळे महाराष्ट्र हा क्रमांक एकवर असून यापुढील काळातही तो पहिल्या क्रमांकावरच राहणार असल्याचेही फडणवीस यांनी यावेळी नमूद केले.

राज्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढला असून ब्लॉकचेन, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सुरू होत आहे. मुंबई विद्यापीठात एआय सेंटर ऑफ एक्सलन्सी सुरू करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. तसेच गुगलच्या सहाय्याने नागपूरमध्येही सेंटर ऑफ एक्सलन्सी सुरू करत आहोत. पुढील काळात संपूर्ण गव्हर्नन्स मॉडेल बदलणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी डिजिटल ट्रान्झाशन रोडमॅप तयार केला आहे. त्या दिशेने महाराष्ट्राचीही वाटचाल सुरू आहे. ब्लॉकचेन तंत्रज्ञानामुळे अभिलेख (रेकॉर्ड) जतन करण्याची प्रक्रिया सोपी झाली आहे. त्याचप्रमाणे मेटाव्हर्स तंत्रज्ञानाचाही विविध प्रकल्पांमध्ये वापर वाढविला आहे. येत्या दोन-चार वर्षात मुंबईतील अनेक प्रकल्पांसाठी मेटाव्हर्स तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागापर्यंत आरोग्य व शिक्षण सेवा पोहोचविणे सुलभ होत आहे.

IPL_Entry_Point