मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Devendra Fadnavis: 'शिवसेनच्या चिन्हावरून वाद कशाला', पवारांच्या वक्तव्यावर फडणवीस म्हणाले, तेव्हा..

Devendra Fadnavis: 'शिवसेनच्या चिन्हावरून वाद कशाला', पवारांच्या वक्तव्यावर फडणवीस म्हणाले, तेव्हा..

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Aug 11, 2022 09:22 AM IST

Devendra Fadnavis On Sharad Pawar: काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर आम्ही वेगळं चिन्ह आणि वेगळा पक्ष काढला, काँग्रेसचं चिन्ह आम्ही मागितलं नाही असं शरद पवार म्हणाले होते.

शिवसेना चिन्हाबाबत पवारांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांचे उत्तर
शिवसेना चिन्हाबाबत पवारांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांचे उत्तर (फोटो - हिंदुस्तान टाइम्स)

Devendra Fadnavis On Sharad Pawar: सध्या शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावरून वाद सुरू आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली होती. शरद पवार यांनी आपण स्वत: काँग्रेसमधून बाहेर पडल्याचा संदर्भ देत वक्तव्य केलं होतं. या वक्तव्याला आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. ठाण्यात एका कार्यक्रमात फडणवीस आले होते, तेव्हा कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली.

बंडखोर आमदारांना वेगळी भूमिका घ्यायची असल्यास ते वेगळा पक्ष काढू शकतात आणि चिन्ह ठरवू शकतात. मात्र कुणी काहीही कारण काढून वाद वाढवत असेल तर लोक त्यांना पाठिंबा देणार नाहीत असं शरद पवार म्हणाले होते. तसंच धनुष्यबाण हे शिवसेनेचं चिन्ह असून बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या आणि त्यांच्या विचारांमधून ते स्वीकारण्यात आलं आहे. एखाद्या राष्ट्रीय पक्षाचे चिन्ह काढून घेणे, त्यातून वाद निर्माण करणे योग्य नाही असं शरद पवार म्हणाले होते.

काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर आम्ही त्यांच्या चिन्हावर दावा केला नाही या पवारांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांनी टोला लगावताना म्हटलं की, “शरद पवार यांनी पक्ष बदलला तेव्हा कायदेच नव्हते. डिफेक्शनचे कायदे कुठे होते तेव्हा? कोणालाही कसंही बनवता यायचं. आज कायदे तयार झाले आहेत. त्यामुळे कायदेशीर लढाई करावी लागते. ती कायदेशीर लढाई शिवसेना, शिंदे साहेब करत आहेत."

शरद पवार यांनी तेव्हा आपण काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतरच्या घटनेचा दाखला दिला होता. ते म्हणाले होते की, "माझेही काँग्रेससोबत मतभेद झाले. तेव्हा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस हा वेगळा पक्ष काढला आणि ‘घड्याळ’ हे वेगळं चिन्ह घेतलं. आम्ही त्यांच्या चिन्हावर दावा केला नाही आणि वादही वाढवला नाही. जर कुणी काही ना काही कारण काढून वाद वाढवत असेल तर लोकं पाठिंबा देणार नाहीत."

IPL_Entry_Point