Devendra Fadnavis : एखाद्या गाडीखाली श्वान आला तरी ते माझा राजीनामा मागतील; फडणवीसांचा विरोधकांना बोचरा टोला
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Devendra Fadnavis : एखाद्या गाडीखाली श्वान आला तरी ते माझा राजीनामा मागतील; फडणवीसांचा विरोधकांना बोचरा टोला

Devendra Fadnavis : एखाद्या गाडीखाली श्वान आला तरी ते माझा राजीनामा मागतील; फडणवीसांचा विरोधकांना बोचरा टोला

Feb 09, 2024 02:15 PM IST

Devendra Fadnavis on Abhishek Ghosalkar Murder : अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येवर प्रतिक्रिया देताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांनाही सुनावलं आहे.

Devendra Fadnavis on Abhishek Ghosalkar Murder Case
Devendra Fadnavis on Abhishek Ghosalkar Murder Case

Devendra Fadnavis on Abhishek Ghosalkar Murder : ‘अभिषेक घोसाळकर यांच्या बाबतीत घडलेली घटना अत्यंत दु:खद आहे. एका तरुण नेत्याचं अशा पद्धतीनं निधन व्हावं हे दुर्दैवी आणि गंभीर आहे. मात्र, या प्रकरणाला काही लोक राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत ते योग्य नाही,’ अशी प्रतिक्रिया राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची ८ फेब्रुवारी रोजी एका गुंडानं गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेनंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झाले असून त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. फडणवीस यांनी या घटनेबद्दल सविस्तर प्रतिक्रिया दिली. त्याचवेळी राजीनाम्याची मागणी करणाऱ्या विरोधकांनाही सुनावले. 

‘अभिषेक घोसाळकर यांच्या बाबतीत घडलेली घटना गंभीर आणि दु:खद आहे. मात्र, मॉरिस नोरोन्हा असेल किंवा अभिषेक घोसाळकर असतील या दोघांचेही अनेक ठिकाणी एकत्र पोस्टर आहेत. वर्षानुवर्षे ते एकत्र काम करत होते. कोणत्या विषयातून त्यांचा इतका बेबनाव झाला की एकानं दुसऱ्याला गोळ्या घालून मारावं आणि स्वत:लाही संपवावं हा तपासाचा विषय आहे. पोलीस चौकशी करत आहेत. वेगवेगळ्या गोष्टी पोलिसांपर्यंत आल्या आहेत. त्या योग्य वेळी समोर येतील. वेगवेगळी कारणं सांगितली जात आहेत. ठोस माहिती मिळाली की ती सर्वांना देऊ,' असं फडणवीस यांनी सांगितलं.

 'या घटनेचं राजकारण करणं योग्य नाही. या प्रकरणाकडं बोट दाखवून कायदा आणि सुव्यवस्था संपलीय असं म्हणणं चुकीचं आहे. वैयक्तिक वैमनस्यातून घडलेली ही घटना आहे. अर्थात, बंदुका किंवा अन्य शस्त्रांचे परवाने वगैरे देण्याच्या बाबतीत अधिक काळजी घेता येईल का याचा विचार राज्य सरकार निश्चित करेल, असं फडणवीस म्हणाले.

विरोधकांना सणसणीत टोला

विरोधकांनी फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यावरही फडणवीसांनी भाष्य केलं. ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माझ्यावर होणारे आरोप पूर्णपणे राजकीय आहेत. ही घटना गंभीर आहेच, पण विरोधकांची परिस्थिती आता अशी आहे की एखाद्या गाडीखाली एखादा श्वान आला तरी ते गृहमंत्र्यांचा राजीनामा मागतील. त्यामुळं त्यांनी राजीनामा मागितला यात आश्चर्य नाही. हे सगळं वैयक्तिक वैमनस्यातून झालंय हे त्यांनाही माहीत आहे. पण विरोधक त्यांचं काम करत आहेत,’ असं फडणवीस म्हणाले.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर