एक है तो सेफ है… ही घोषणा महाराष्ट्रानं सत्यात उतरवली; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  एक है तो सेफ है… ही घोषणा महाराष्ट्रानं सत्यात उतरवली; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

एक है तो सेफ है… ही घोषणा महाराष्ट्रानं सत्यात उतरवली; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

Nov 23, 2024 05:13 PM IST

Devendra Fadnavis on Election Results : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

एक है तो सत्य है… ही घोषणा महाराष्ट्रानं सत्यात उतरवली; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
एक है तो सत्य है… ही घोषणा महाराष्ट्रानं सत्यात उतरवली; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? (Hindustan Times)

Devendra Fadnavis latest news : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीमध्ये आनंदाचं वातावरण आहे. भाजपचे कार्यकर्ते महायुतीच्या विजयाचं श्रेय देवेंद्र फडणवीस यांना दिलं जात आहेत. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या एकजुटीला आणि जनतेला या विजयाचं श्रेय दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली 'एक है तो सेफ है' ही घोषणा महाराष्ट्रानं सत्यात उतरवली आहे, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली आहे.

महायुतीच्या अभूतपूर्व विजयानंतर फडणवीस पत्रकारांशी बोलत होते. 'मी महाराष्ट्राच्या जनतेसमोर नतमस्तक आहे, असं फडणवीस म्हणाले. लोकसभा निवडणुकीच्या वेळी आमच्या विरोधकांनी एक फेक नरेटिव्ह पसरवला होता. तो फेक नरेटिव्ह यावेळी राष्ट्रवादी संघटनांनी खोडून काढला. यावेळी देखील मतांच्या ध्रुवीकरणाचा प्रयत्न झाला, मात्र तो यशस्वी झाला नाही. महाराष्ट्राला साधूसंतांची परंपरा आहे. या परंपरा जपणारे अनेक पंथ आहेत. त्यांनीही मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली. लोकांना एकत्र ठेवण्याचं काम केलं. हा निकाल हे त्याचं फळ आहे, असं फडणवीस म्हणाले.

'ही निवडणूक महायुतीनं एकजुटीनं लढली. एकनाथ शिंदे, अजित पवार यांनीही मेहनत घेतली. भारतीय जनता पक्षानं केवळ आपल्याच उमेदवारांसाठी काम केलं असं नाही. महायुतीच्या सर्व २८८ उमेदवारांसाठी काम केलं. आमच्या महायुतीचा हा विजय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं पाठबळ आम्हाला होतंच, पण गृहमंत्री अमित शहा, जे पी नड्डा, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, निवडणूक प्रभारी भूपेंद्र पटेल या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो, असं फडणवीस म्हणाले.

मी आधुनिक अभिमन्यू

'मी याआधीही म्हटलं होतं की मी आधुनिक अभिमन्यू आहे. चक्रव्यूह कसा भेदायचा हे मला माहीत आहे. अर्थात, या सगळ्यात माझा खूप छोटा वाटा आहे. माझ्या पक्षाची व कार्यकर्त्यांची यात मोठी मेहनत आहे. महाराष्ट्र नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी आहे हे पुन्हा दिसलं, असं फडणवीस म्हणाले.

ईव्हीएम संदर्भातील आरोपांना उत्तर

विधानसभा निवडणुकीच्या निकालात नक्कीच काहीतरी गडबड आहे. अन्यथा असा निकाल लागूच शकत नाही. ईव्हीएमच्या ऐवजी बॅलट पेपरवर निवडणुका घ्या, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली होती. त्यावरही फडणवीस यांनी भाष्य केलं. 'झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चाचा विजय झाला आहे. याचा अर्थ तिथं ईव्हीएम एकदम चांगलं आणि सुरक्षित आहे. मात्र, इथं महाविकास आघाडी भुईसपाट झाली म्हणून ईव्हीएममध्ये गडबड आहे. त्यामुळं या असल्या गोष्टींना काही अर्थ नाही, असं फडणवीस म्हणाले.

Whats_app_banner