मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Dasara Melava: शिंदे विकासावर बोलले, तर शिवाजी पार्कवर शिमगा; फडणवीसांची प्रतिक्रिया

Dasara Melava: शिंदे विकासावर बोलले, तर शिवाजी पार्कवर शिमगा; फडणवीसांची प्रतिक्रिया

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Oct 06, 2022 02:43 PM IST

Devendra Fadnavis On Dasara Melava: शिंदेंना भाजपने स्क्रिप्ट लिहून दिली असा आरोप कऱणाऱ्यांना फडणवीस यांनी उत्तर दिलं असून ते म्हणाले की, 'तुमच्या स्क्रिप्टरायटरला क्रिएटिव्हीटी दाखवायला सांगा, अन्यथा नवा स्क्रिप्टरायटर आणा.'

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (HT PHOTO)

Devendra Fadnavis On Dasara Melava: दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकमेकांवर जोरदार टीकास्र सोडलं. दोघांच्याही भाषणामुळे सध्या राजकीय वातावरण तापलं आहे. वेगवेगळ्या पक्षातील नेत्यांच्या यावर प्रतिक्रिया येत आहेत. आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली असून उद्धव ठाकरेंचे भाषण आपण ऐकलं नसल्याचं म्हटलंय. तसंच शिंदेंनी खरी शिवसेनाही कोणती हे दाखवून दिलं असं म्हणाले.

बीकेसीच्या मैदानावरची गर्दी पाहता एकनाथ शिंदेंनी खरी शिवसेना कोणती हे दाखवून दिलं. शिवाजी पार्कपेक्षा बीकेसी मैदानाची क्षमता दुप्पट आहे. तरीही तिथे तुडुंब गर्दी होती. राज्यातून लोक आले होते. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी खरी शिवसेना एकनाथ शिंदेंची हे काल मेळाव्यात प्रस्थापित केलं. मी त्यासाठी त्यांचे अभिनंदन करतो असंही फडणवीस म्हणाले.

एकनाथ शिंदेंच्या भाषणावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी आम्ही काय करतोय आणि काय करणार हे सांगितलं. तर मागच्या काळात उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री नेमकं हेच होतं नव्हतं. ते मुख्यमंत्री असतानाही पक्षप्रमुखाचंच भाषण करायचे.

उद्धव ठाकरे यांच्या भाषणावर विचारण्यात आलेल्या सर्व प्रश्नांवर देवेंद्र फडणवीस यांनी एकच उत्तर दिलं. शिवाजी पार्कवर शिमगा झाला, शिमग्यावर सूज्ञ माणूस कधीही बोलत नाही. शिमग्यावर प्रतिक्रिया देत नसतात अशा शब्दातंच फडणवीस यांनी उत्तरे दिली.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या भाषणावर टीका झाली. त्यांना भाजपने स्क्रिप्ट लिहून दिली होती असा आरोप होत आहे. याबाबत विचारले असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जे असं म्हणत आहेत त्यांनी आपला स्क्रिप्ट रायटर बदलावा. तेच ते, किती वेळा तीच स्क्रिप्ट. तुमच्या स्क्रिप्टरायटरला क्रिएटिव्हीटी दाखवायला सांगा, अन्यथा नवा स्क्रिप्टरायटर आणा. आम्हाला हे ऐकून कंटाळा आलाय.

उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात एक वचन दिलं ते म्हणजे पुन्हा एकदा शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल. यावरही देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, "विधानसभेवर भगवा फडकणारच. पण तो शिंदेंच्या नेतृत्वाखाली खरी शिवसेना आणि भाजप यांच्या युतीचा भगवा फडकणार."

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या