मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Devendra Fadnavis: मुंबई अध्यक्षपदासाठी भाजपनं आशिष शेलारांनाच का निवडलं?; फडणवीसांनी सांगितलं

Devendra Fadnavis: मुंबई अध्यक्षपदासाठी भाजपनं आशिष शेलारांनाच का निवडलं?; फडणवीसांनी सांगितलं

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Aug 20, 2022 02:14 PM IST

Devendra Fadnavis praises Ashish Shelar: मुंबई भाजपचे नवे अध्यक्ष आशिष शेलार यांचं कौतुक करताना देवेंद्र फडणवीस यांनी आज जोरदार राजकीय टोलेबाजी केली.

Ashish Shelar - Devendra Fadnavis
Ashish Shelar - Devendra Fadnavis

Devendra Fadnavis praises Ashish Shelar: मुंबई भाजपचे नवनिर्वाचित अध्यक्ष आशिष शेलार व मंत्रिमंडळात वर्णी लागलेले आमदार मंगलप्रभात लोढा यांचा सत्कार आज मुंबई भाजपच्या वतीनं करण्यात आला. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेलार यांचं तोंडभरून कौतुक केलं. मुंबई भाजपच्या अध्यक्षपदासाठी आशिष शेलार यांचीच निवड का करण्यात आली, यामागचं कारणही फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.

‘आपण छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे लोक आहोत. शिवाजी महाराजांना जेव्हा कुठलीही महत्त्वाची मोहीम फत्ते करावी लागायची, तेव्हा ते आपल्या बिनीच्या शिलेदाराची निवड करत. आपल्यालाही मुंबई महापालिकेवर भगवा फडकवण्याची मोहीम फत्ते करायची आहे. त्यासाठीच शेलार यांच्यासारखा बिनीचा शिलेदार पक्षानं निवडला आहे,’ असं फडणवीस म्हणाले.

‘शेलार यांच्या नेतृत्वाखाली याआधीही भाजपनं मोठी मजल मारली होती. त्याचवेळी भाजप महापौर बसवू शकली असती, पण मित्र पक्षासाठी आम्ही दोन पावलं मागे आलो. आता मात्र मुंबई महापालिकेवर शिवसेना भाजप युतीचा भगवाच फडकेल आणि हा भगवा बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील खऱ्या शिवसेनेचा असेल, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना हाणला.

आशिष शेलार यांच्या कार्याचा फडणवीस यांनी यावेळी गौरव केला. 'शेलार हे स्वत: क्रिकेट खेळले आहेत आणि क्रिकेटच्या संघटनांवरही आहेत. ट्वेंटी ट्वेंटी कशी खेळायची आणि जिंकायची हे त्यांना माहीत आहे. मुंबई प्रीमिअर लीग त्यांनीच सुरू केली आहे. आता मुंबई विकास लीग सुरू करायची आहे. त्यात काही लोक अडथळे आणण्याचा प्रयत्न करतील, पण वेळ पडल्यास अशा अडथळ्यांना किक कशी मारायची हे फुटबॉलचे जाणकार असलेल्या शेलार यांना चांगलं माहीत आहे. उड्या मारणारे काही लोक आहेत, पण शेलार हे दोरीवरील उड्या असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. त्यामुळं कुणाला किती उडू द्यायचं आणि कुठं दोरी खेचायची हे देखील त्यांना चांगलं माहीत आहे, असा इशारा फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला दिला.

IPL_Entry_Point