मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  MNS BJP Yuti : महायुतीमध्ये चौथा भिडू?; देवेंद्र फडणवीस आणि मनसेच्या नेत्यांमध्ये बंद दाराआड खलबतं

MNS BJP Yuti : महायुतीमध्ये चौथा भिडू?; देवेंद्र फडणवीस आणि मनसेच्या नेत्यांमध्ये बंद दाराआड खलबतं

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Feb 07, 2024 01:14 PM IST

MNS BJP Alliance Buzz News : मनसेच्या काही नेत्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याच्या पार्श्वभूमीवर भाजप-मनसे युतीची चर्चा सुरू झाली आहे.

Devendra Fadnavis - Raj Thackeray
Devendra Fadnavis - Raj Thackeray

MNS leaders meeting with Devendra Fadnavis : लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसा राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मनसेच्या काही नेत्यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या सर्व नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली असून त्यामुळं मनसे व भाजप युतीचे आडाखे बांधले जाऊ लागले आहेत.

आगामी लोकसभा निवडणूक ही भाजपच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची आहे. भाजपला तिसऱ्यांदा सत्तेत यायचं असून पंतप्रधान मोदी यांनी ४०० हून जास्त खासदार निवडून आणण्याचा निर्धार बोलून दाखवला आहे. हा निर्धार प्रत्यक्षात आणण्यासाठी भाजपनं देशातील सर्वच राज्यांत मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महाराष्ट्रातही पक्की बांधबंदिस्ती करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये फूट पाडून भाजपनं दोन्ही पक्षातील एकेक गट स्वत:सोबत घेतले आहेत. मात्र, त्यानंतरही उद्धव ठाकरे व शरद पवार हे जोमानं लढत आहेत. त्यामुळं भाजपनं मनसेलाही सोबत घेण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर राज ठाकरे यांनी आतापर्यंत ‘एकला चलो रे’चा मार्ग स्वीकारला आहे. त्यात अपवाद वगळता त्यांना यश आलेलं नाही. विधानसभेत हा पक्ष १३ आमदारांवरून एका आमदारावर आला आहे. तर, नाशिक महापालिकेतील सत्ताही गमावली आहे. आताच्या परिस्थितीत पुन्हा एकदा जम बसविण्याची संधी मनसेला आहे. मनसे नेते व फडणवीसांमधील भेटीकडं याच दृष्टीनं पाहिलं जात आहे.

फडणवीसांची भेट घेणाऱ्या मनसेच्या नेत्यांमध्ये बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि संदीप देशपांडे यांचा समावेश होता. ही भेट सदिच्छा होती असं मनसेकडून सांगण्यात आलं आहे. मात्र, तरीही त्यातून वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत.

युती की मैत्रीपूर्ण लढत?

कोणत्याही पक्षासोबत जाण्यास राज ठाकरे हे फारसे अनुकूल नसल्याचं समजतं. तर, युती करून सत्तेत सहभागी होता येईल असं कार्यकर्त्यांचं मत असल्याचं बोललं जातं. त्यातून मध्यममार्ग म्हणजे आगामी निवडणुकांमध्ये काही मतदारसंघांमध्ये मैत्रीपूर्ण लढती करता येतील का याची चाचपणी केली जात असल्याची चर्चा आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपला राज ठाकरे यांची गरज लागू शकते. त्या दृष्टीनंही काही चर्चा झाली असण्याची शक्यता आहे.

WhatsApp channel