Devendra Fadnavis Calls Eknath Shinde: महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यानंतर शिंदे गटाचे नेते एकनाथ शिंदे हे नाराज असल्याच्या चर्चांना पूर्णविराम लागला. मात्र, खातेवाटपावरून महायुतीत रस्सीखेच सुरू असल्याचे दिसून येत आहे. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार दिल्लीत एकत्र येऊन मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा करणार होते. पण बुधवारी दुपारी केवळ देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दिल्लीला रवाना झाले. त्यांनी दिल्लीत अमित शहा आणि जेपी नड्डा यांची भेट घेतली. परंतु, एकनाथ शिंदे हे दिल्लीत न गेल्याने ते नाराज असल्याचे चर्चेला उधाण आले
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहा यांच्याशी बराच वेळ चर्चा केली. तिथे बसून देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना फोन केल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपाबाबत चर्चा झाली. त्यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी पाठविण्यात आले. त्यांनीच एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली. एकनाथ शिंदे यांना गृहमंत्रालय दिले जात नाही. त्यांना सार्वजनिक बांधकाम आणि महसूल मंत्रालय देऊन त्यांना खूश करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
अमित शहा यांच्या शेजारी बसून देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना हीच ऑफर दिली. एकनाथ शिंदे यांची भूमिका काय आहे? हे कळू शकलेले नाही. पण ते नाराज असल्याचे त्यांच्या भूमिकेवरून स्पष्ट होते. बुधवारी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एकत्र गेले आणि दोघांमध्ये चांगली जुळवाजुळव पाहायला मिळाली. अजित पवार यांना त्यांच्या मनासारखे खाते मिळाल्याने ते खूश आहेत, असे बोलले जात आहे. अजित पवारांपेक्षा शिवसेनेला जास्त मंत्रिपद मिळायला हवे, असे एकनाथ शिंदे यांना वाटते. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, भाजपला २० ते २२ खाती स्वत:कडे ठेवायची आहेत. तर, शिंदे आणि अजित पवार यांना प्रत्येकी १०-१० मंत्रिपदे देण्यास ते तयार आहेत.
पण एकनाथ शिंदे गटाचे म्हणणे आहे की, आपल्याकडे किमान १२ विभाग असावेत. कारण शिंदे गटाला अजित पवार गटापेक्षा जास्त जागा मिळाल्या असून ते भाजपचा जुना मित्रपक्ष आहे. तर, अजित पवारांचा गट मध्यंतरी शिंदे सरकारमध्ये सामील झाला आहे. काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार व्यवहारी आहेत. तर, एकनाथ शिंदे भावूक आहेत, असे फडणवीसांनी म्हटले आहे. तसेच त्यांना एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत काम करण्यास कोणतीही अडचण नाही, असेही ते म्हणाले होते.
संबंधित बातम्या