होय ते पुन्हा आले! देवेंद्र फडणवीसांचे अभिनंदन करत ठाकरेंच्या शिवसेनेच्या सामनाच्या अग्रलेखातून कानपिचक्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  होय ते पुन्हा आले! देवेंद्र फडणवीसांचे अभिनंदन करत ठाकरेंच्या शिवसेनेच्या सामनाच्या अग्रलेखातून कानपिचक्या

होय ते पुन्हा आले! देवेंद्र फडणवीसांचे अभिनंदन करत ठाकरेंच्या शिवसेनेच्या सामनाच्या अग्रलेखातून कानपिचक्या

Dec 06, 2024 08:15 AM IST

Samana Editorial on Maharashtra New CM Devendra Fadnavis: उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने नवनियुक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या नव्या सरकारला सामनाच्या अग्रलेखातून शुभेच्छा देत कानपिचक्या देखील दिल्या आहेत.

होय ते पुन्हा आले! देवेंद्र फडणवीसांचे अभिनंदन करत ठाकरेंच्या शिवसेनेच्या सामनाच्या अग्रलेखातून कानपिचक्या
होय ते पुन्हा आले! देवेंद्र फडणवीसांचे अभिनंदन करत ठाकरेंच्या शिवसेनेच्या सामनाच्या अग्रलेखातून कानपिचक्या

Samana Editorial on Maharashtra New CM Devendra Fadnavis: महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांना गुरुवारी विराजमान झाले. महायुतीसरकारचा गुरुवारी भव्यदिव्य शपथविधीसमारोह झाला. एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपद व गोपनियतेची शपथ घेतली. अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. शपथविधी नंतर या तिन्ही नेत्यांना देशभरातून अनेकांनी शुभेच्छा दिल्या. उद्धव ठाकरे गटाच्या शिवसनेने देखील या तिघांना सामनाच्या अग्रलेखातून ते पुन्हा आले म्हणत शुभेच्छा दिल्या आहेत. या सोबत काही कानपिचक्या देखील अग्रलेखातून देण्यात अळ्या आहेत.

काय आहे सामनाच्या अग्रलेखात ?

महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी बसणे म्हणजे आता काटेरी खुर्चीवर विराजमान होण्यासारखेच आहे. देवेंद्र फडणवीस त्या महान खुर्चीवर पुन्हा विराजमान झाले. ही त्यांची जिद्द होतीच. त्यांनी दिवसाढवळ्या शपथ घेतली. राज्य बहुमताचे आहे, पण बहुमत खोटे आहे. यासाठी लोक गावागावांत रस्त्यावर उतरले आहेत. न्यायालये, निवडणूक आयोग, ईव्हीएम या त्रिवेणी संगमातून महाराष्ट्रात नवे राज्य आले. तरीही देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन, असे या अग्रलेखात म्हटलं आहे.

रात्री अपरात्री वेशांतर करून...

अग्रलेखातून शुभेच्छा देतांना काही चिमटे देखील महायुतीसरकारला काढण्यात आले आहे. आग्रलेखात लिहिलं आहे की, विधानसभेचे निकाल लागल्यावर तब्बल बारा दिवसांनीमहाराष्ट्रात नवे सरकार विराजमान झाले. मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस पुन्हा आले. फडणवीस मुख्यमंत्री झाले म्हणजे गुजरातचे बाहुले शिंदे उडाले, हा त्याचा सरळ अर्थ. मात्र त्या शिंद्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार यांचे उपमुख्यमंत्रीपद तर ध्रुव बाळाप्रमाणे अढळ आहे, पण संघर्ष, अपमान, अवहेलना यांचे हलाहल पचवून फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले हे महत्त्वाचे.

आता मुख्यमंत्री होण्यासाठी त्यांना रात्री-अपरात्री वेषांतर करून, काळोखात लपून-छपून भेटीगाठी घ्याव्या लागल्या नाहीत. विधानसभेचा कौल भाजप व त्यांच्या मित्रपक्षांच्या बाजूने लागला. पूर्ण बहुमत मिळाले. इतकी 'धो-धो' मते पडून आपण विजयी झालो कसे? हा प्रश्न फडणवीस यांच्यासह समस्त भाजपला पडला. त्याच अचंबित चेहऱ्याने फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांवर अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे. 'शपथविधीच्या सोहळ्यासाठी आझाद मैदानावर चला', अशा जाहिराती वृत्तवाहिन्यांवर प्रसारित झाल्या. महाराष्ट्राचे दिवाळे वाजत असले तरी शपथ सोहळ्याची दिवाळी साजरी केली गेली. भारतीय जनता पक्षाला १३२ जागा मिळाल्या, त्यांचे दोन मित्रपक्ष मिळून सवादोनशेचे पाशवी बहुमत असतानाही बारा दिवसांचा कालावधी सरकार स्थापनेसाठी का लागला? या काळात मावळत्या मुख्यमंत्र्यांचे रुसवे-फुगवे महाराष्ट्राने पाहिले. मीच पुन्हा मुख्यमंत्री होणार व तसे आपल्याला दिल्लीचे वचन आहे हा त्यांचा दावा होता. मी काम केले म्हणून हा विजय भाजपला मिळाल्याचे ते बोलत राहिले. मुख्यमंत्रीपदाशिवाय खाली काहीच घेणार नाही हा त्यांचा हट्ट होता. त्या फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. फडणवीस यांचे सरकार स्थानापन्न होत असताना महाराष्ट्रात आनंदाचे मोठे वातावरण आहे असे दिसत नाही. कारण जनतेला भाजपच्या विजयाचा संशय आहे. हा विजय खरा नाही हे सांगण्यासाठी लोक रस्त्यावर उतरले आहेत.

मारकडवाडी घटनेवरही भाष्य

या अग्रलेखात मारकडवाडी घटनेचा देखील उल्लेख करण्यात आला आहे. मारकडवाडी गावात लोकांनी मतपत्रिकेवर पुन्हा मतदान घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, १४४ कलम लावून तया ठिकाणी दडपशाही करून लोकशाहीचा गळा घोटला. मारकडवाडीचे हे लोण राज्यातील गावागावांत पसरत गेले तर कायदा-सुव्यवस्थेचे संकट निर्माण होईल. अशा वेळी नवे मुख्यमंत्री दडपशाही करणार की संयमाने वागणार? हा प्रश्न आहे. देवेंद्र फडणवीस हे जातीयवादी व सुडाने वागणारे आहेत हा त्यांच्यावरचा ठपका ते कसा पुसणार? यंत्रणांचा गैरवापर व त्यातून दहशत निर्माण करून फडणवीस यांनी पक्षांतर्गत व बाहेरच्या विरोधकांचा काटा काढला. फडणवीस पुन्हा असेच वागणार असतील तर बहुमत कुचकामी ठरेल.

मुंबईत मराठी द्वेष

भाजपचा विजय झाल्यापासून मुंबईसारख्या शहरात मराठीद्वेष्टे साप वळवळू व फूत्कार सोडू लागले. मुंबईत मराठी माणूस अपमानित करण्याची एकही संधी हे लोक सोडत नाहीत. मराठीस अभिजात भाषेचा दर्जा दिल्याचा डंका वाजवला, पण मुंबईत मराठी बोलण्यावर व मराठी जगण्यावर फडफडत आहेत व ही गिधाडे स्वतःला भाजप समर्थक म्हणवून घेत असतील तर मुख्यमंत्री म्हणून फडणवीस या गिधाडांचा बंदोबस्त करण्याची हिंमत दाखवतील काय? हे राज्य मराठी भाषिक आहे व त्यासाठी मराठी माणसाने रक्त सांडले आहे याचे स्मरण नव्या सरकारने ठेवायला हवे. राज्याच्या सर्वोच्च खुर्चीवर बसून देवेंद्र फडणवीस कोणत्या दिशेने जाणार आहेत? असा सवाल देखील अग्रलेखात उपस्थित करण्यात आला आहे.

मुख्यमंत्र्यांची खुर्ची ही काटेरी

अग्रलेखाच्या शेवटी लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करत लहिलं आहे की, लाडक्या बहिणींच्या योजनेमुळे ४४ हजार कोटींचा बोजा राज्यावर आहे. १५०० ऐवजी बहिणींना २१०० रुपये देऊ असे या मंडळींनी निवडणूक प्रचारात वचन दिले. त्यामुळे बोजा वाढत जाईल. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचेही वचन आहे. ही वचने पूर्ण करण्यासाठी त्यांना आर्थिक नियोजन व शिस्त लावावी लागेल. मिंधे काळात झालेल्या लुटमारीस पायबंद घालून हे राज्य चोर- दरोडेखोरांच्या हातून सुटले आहे, असा विश्वास जनतेला द्यावा लागेल, असे अग्रलेखात म्हटलं आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर