अजित पवारांसोबतची युती नैसर्गिक नाही; त्यांना आमचा गुण लागायला वेळ लागेल; फडणवीस यांनी उडवून दिली खळबळ-devendra fadnavis latest comment on mahayuti and alliance with ajit pawar ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  अजित पवारांसोबतची युती नैसर्गिक नाही; त्यांना आमचा गुण लागायला वेळ लागेल; फडणवीस यांनी उडवून दिली खळबळ

अजित पवारांसोबतची युती नैसर्गिक नाही; त्यांना आमचा गुण लागायला वेळ लागेल; फडणवीस यांनी उडवून दिली खळबळ

Sep 06, 2024 01:38 PM IST

Devendra Fadnavis on Yuti with Ajit Pawar : अजित पवार यांच्यासोबतची आमची युती नैसर्गिक नाही, अशी कबुली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

अजित पवारांसोबतची युती नैसर्गिक नाही; त्यांना आमचा गुण लागायला वेळ लागेल; फडणवीस यांनी उडवून दिली खळबळ
अजित पवारांसोबतची युती नैसर्गिक नाही; त्यांना आमचा गुण लागायला वेळ लागेल; फडणवीस यांनी उडवून दिली खळबळ

Devendra Fadnavis : काँग्रेस, राष्ट्रवादी व उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची युती नैसर्गिक नसल्याची टीका करणाऱ्या भाजपची गोची करणारंं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. त्यांनी महायुतीबद्दल टिप्पणी केली आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत असलेली आमची युती नैसर्गिक नाही. अजितदादांना आमचा गुण लागण्यासाठी वेळ लागेल, असं त्यांनी म्हटलं आहे.

टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी हे विधान केलं आहे. अजित पवार यांनी अलीकडंच आपल्या राजकीय भूमिकेविषयी वक्तव्य केलं होतं. महायुतीत असलो तरी धर्मनिरपेक्षतेशी तडजोड करणार नाही, असं त्यांनी म्हटलं होतं. त्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्याला महत्त्व आहे.

अजित पवारांसोबत जाणं ही चूक नव्हती!

लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या झालेल्या दारुण पराभवानंतर अजित पवार यांच्याशी झालेल्या युतीकडं बोट दाखवलं गेलं होतं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानंही आपल्या मुखपत्रातून नाराजी व्यक्त केली होती. ती चूक होती का असं फडणवीसांना विचारलं असता त्यांनी 'नाही' असं उत्तर दिलं. ती त्या वेळेची गरज होती. आलेली संधी कधी सोडायची नसते. सगळं काही स्थिरस्थावर व्हायला थोडा वेळ लागेल. त्यांना आमचा गुण लागेल. त्यामुळं दोघांचाही फायदा होईल, असं फडणवीस म्हणाले.

लोकसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या मतांचं विश्लेषणही त्यांनी केलं. 'महायुती आणि महाविकास आघाडीच्या मतांमध्ये केवळ तीन टक्क्यांचा फरक आहे. त्यातून विजयी जागांचा आकडा बदलला. भाजपची मतं जितक्या सहजपणे शिवसेनेला मिळाली आणि शिवसेनेची मतं जितक्या नॅचरली आमच्याकडं आली, तसं अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या मतांचं झालं नाही. आमचीही मतं त्यांना पूर्ण मिळाली असं म्हणता येणार नाही. त्यासाठी थोडा वेळ लागेल. येत्या विधानसभा निवडणुकीत मतं एकमेकांकडं ट्रान्सफर होतील, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

ही युती टिकेल आणि चालेल!

शिवसेनेशी आमची युती नैसर्गिक आहे. वर्षानुवर्ष आम्ही एकत्र काम करतोय. मागील काही वर्षांत राजकीय परिस्थिती बदलल्यामुळं अजितदादा सोबत आले. ही युती राजकीय आहे. आणखी पाच-दहा वर्षांनंतर ही युती नॅचरलहोईल. आज तसं आहे असं म्हणता येणार नाही. असं असलं तरी ही युती तकलादू नाही. ती अनेक वर्षे चालेल, असं फडणवीस म्हणाले.