Devendra Fadnavis Maharashtra CM : आज मुंबईत आझाद मैदानावर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री म्हणून शाही शपथविधी पार पडणार आहे. यावेळी अजित पवार व एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना देखील स्वत: फोन करत शपथविधी सोहळ्यासाठी खास आमंत्रण दिले आहे. फडणवीस यांनी जेष्ठ नेते शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, नाना पटोले यांच्यासह आदींना फोन केले. त्यांचे हे कट्टर विरोधक शपथविधीला उपस्थित राहणार का ? या कडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी आज होणाऱ्या शपथविधीला विरोधकांना देखील आमंत्रित केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील बड्या नेत्यांना फोन करून सोहळ्याचे निमंत्रण दिलं आहे. त्यांनी शपथविधीसाठी शरद पवारांना निमंत्रण दिलं आहे. या सोबतच उद्धव ठाकरे, नाना पटोले यांना देखील त्यांनी आमंत्रण दिले आहे. मात्र, हिवाळी अधिवेशन सुरू असल्याने शरद पवार शपथविधीला येणार नसल्याची महिती आहे. तर उद्धव ठाकरे हे देखील शपथ विधीला उपस्थित राहणार नसल्याची माहिती आहे. राज ठाकरे, उध्दव ठाकरे, सुशीलकुमार शिंदे यांच्यासह अन्य नेत्यांना देखील देवेंद्र फडणवीस यांनी फोन करून निमंत्रण देण्यात आले आहे.
मुंबईतील आझाद मैदानावर आज संध्याकाळी ५.३० वाजता शपथविधी सोहळा पार पडणार आहे. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्याला ४० हजार पाहुणे उपस्थित राहणार आहेत. त्यात २००० व्हीआयपी यांचा समावेश आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. या शपथविधीची आझाद मैदानात जय्यत तयारी सुरू आहे. एनडीएशासित सर्व राज्यांचे मुख्यमंत्रीही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने २३५ जागा जिंकल्या आहेत. गेल्या अनेक निवडणुकांनंतर पहिल्यांदाच राज्यात एवढं भक्कम सरकार स्थापन होणार आहे. शपथविधी सोहळ्यासाठी देशाच्या विविध भागांतील संतांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. आझाद मैदान सध्या पूर्णपणे सजले आहे. सुरक्षेसाठी चार हजारांहून अधिक पोलिस अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय एसआरपीएफ, क्विक रिस्पॉन्स टीम आदी ही तैनात आहेत.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्याचा जल्लोष राज्यात सुरू आहे. नागपूरसह सर्वच जिल्ह्यात समर्थकांनी 'आपले देवेंद्र भाऊ'चे पोस्टर लावले आहेत. वयाच्या ५४ व्या वर्षी देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा महाराष्ट्रा मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत. वयाच्या ४४ व्या वर्षी ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी ५ वर्षांचा कार्यकाल पूर्ण केला.
संबंधित बातम्या