लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात झालेल्या पराभवावर भाजपकडून पहिल्यांदाच मोठी प्रतिक्रिया देण्यात आली आहे. भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, अजित पवार यांना सोबत घेतल्यामुळे आमचा लाजीरवाणा पराभव झाला. महाराष्ट्रात येत्या काही दिवसात विधानसभा निवडणुकीची घोषणा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर फडणवीसांनी केलेल्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
एका टीव्ही कॉनक्लेवमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, लोकसभेच्या १२ जागा अशा होत्या, जेथे आम्ही केवळ ३ ते ६ हजार मतांच्या फरकाने पराभूत झालो. एकूण मतांचे अंतर पाहिले तर महाविकास अघाडीहून आम्हाला केवळ २ लाख मते कमी मिळाली. असे यामुळे झाले कारण अजित पवारांचे वोट ट्रान्सफर झाले नाही.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या पराभवाचे मुख्य कारण अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून कमी मतांचे हस्तांतरण असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. भाजपच्या कोअर व्होटर बेसला राष्ट्रवादी सोबतची युती आवडली नसली, तरी ८० टक्के लोकांना अशा राजकीय तडजोडीची गरज आता समजली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
भाजप, अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना या सत्ताधारी आघाडीला राज्यातील लोकसभेच्या ४८ जागांपैकी केवळ १७ जागांवर विजय मिळवता आला. २०२४ च्या निवडणुकीत भाजपला ९ जागा मिळाल्या तर २०१९ च्या निवडणुकीत त्यांना २३ जागा मिळाल्या होत्या.
इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये बोलताना फडणवीस म्हणाले, गेल्या काही सार्वत्रिक निवडणुकांमधील भाजपची ही सर्वात वाईट कामगिरी होती, हे खरे आहे. आम्ही २८ जागा लढवल्या पण तरीही खूप कमी जागा जिंकल्या. मात्र, ३ ते ६ हजार मतांच्या फरकाने आम्ही १२ जागा गमावल्या. एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आम्हाला सर्वाधिक मते मिळाली आहेत.
शिंदे यांची शिवसेना (७ जागा) आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी (१ जागा) यांच्यापेक्षा भाजपने अधिक जागा जिंकल्या. हे फुटीर पक्ष असून एक प्रकारे नवे पक्ष आहेत. त्यांच्यासाठी ही लोकसभा निवडणूक मुळात आपला मतदार प्रस्थापित करण्यासाठी होती. दोघांसाठी ही गोष्ट थोडी अवघड होती. आमच्यासाठी हे तुलनेने सोपे होते कारण आमच्याकडे प्रस्थापित मतदारांचा आधार आहे. अनेक वर्षांपासून दोन्ही पक्षांची युती असल्याने सेनेला आपली मते भाजपला हस्तांतरित करणे सोपे होते, असेही फडणवीस म्हणाले. पण भाजप नेहमीच राष्ट्रवादीच्या विरोधात लढला आहे, त्यामुळे त्यांना मतांचे हस्तांतरण करणे अवघड झाले होते. मात्र, आता दोन्ही पक्षांनी आपला मतदार आधार प्रस्थापित केला आहे.
भाजपच्या कोअर मतदारांना राष्ट्रवादीसोबतची युती पसंत नसल्याची कबुली फडणवीस यांनी दिली. पण या आघाडीची गरज कार्यकर्त्यांना पटवून देण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. राजकीय तडजोडी आपल्या मुल्यांच्या विरोधात जातात, पण तरीही तुम्हाला पुढे जायचे असते. मी खात्री देऊ शकतो की आमच्या किमान ८० टक्के मतदारांना आता राष्ट्रवादीसोबत आघाडीची गरज समजली आहे. राज्यातील विधानसभेच्या २८८ जागांपैकी ८० टक्के जागांवर चर्चा झाली असून कोणत्याही प्रकारच्या आकलनापेक्षा जिंकण्याची क्षमता महत्त्वाची आहे, असेही फडणवीस म्हणाले. महाराष्ट्रात नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे.