‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी’चे प्रमुख असलेल्या एकनाथ शिंदेंच्या विश्वासू सहकाऱ्याला डच्चू; कोण आहेत नवीन प्रमुख?
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  ‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी’चे प्रमुख असलेल्या एकनाथ शिंदेंच्या विश्वासू सहकाऱ्याला डच्चू; कोण आहेत नवीन प्रमुख?

‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी’चे प्रमुख असलेल्या एकनाथ शिंदेंच्या विश्वासू सहकाऱ्याला डच्चू; कोण आहेत नवीन प्रमुख?

Dec 11, 2024 09:27 PM IST

CM Relief Fund - राज्यातील गोरगरीब आणि गरजू नागरिकांना आर्थिक मदत देणाऱ्या राज्य शासनाच्या ‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी’च्या प्रमुखपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामेश्वर नाईक यांची नियुक्ती केली आहे.

एकनाथ शिंदेंच्या विश्वासू सहाकाऱ्याला डच्चू
एकनाथ शिंदेंच्या विश्वासू सहाकाऱ्याला डच्चू

राज्यातील गरजू, गोरगरीब जनतेला गंभीर आजारपणाच्या काळात तत्काळ आर्थिक मदतीसाठी राज्य शासनाच्या ‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षा’कडून त्वरित आर्थिक मदत पुरवण्यात येते. अडीच वर्षापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे समर्थक, माजी पत्रकार असलेले मंगेश चिवटे यांची ‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी’च्या प्रमुखपदी नियुक्ती केली होती. आता मात्र देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मंगेश चिवटे यांना डच्चू देण्यात आला असून रामेश्वर नाईक यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस गेले अडीच वर्ष राज्याचे उपमुख्यमंत्री असताना रामेश्वर नाईक हे त्यांच्या ‘उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षा’चे प्रमुख होते. मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव श्रीकर परदेशी यांनी रामेश्वर नाईक यांच्या नुकतेच नियुक्तीचे पत्र दिले आहे.

एकनाथ शिंदे यांच्या अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात ‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी’च्या माध्यमातून अनेक गरजू रुग्णांवर मोफत उपचाराची सोय करण्यात आली होती. एकनाथ शिंदे यांचे खंदे कार्यकर्ते असलेले माजी पत्रकार मंगेश चिवटे यांनी पुढाकार घेऊन राज्यात अनेक ठिकाणी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून गरजूंना वैद्यकीय मदत पुरवली होती. चिवटे यांनी त्यापूर्वी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख म्हणून कार्य केले होते. राज्याच्या ‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी’चे प्रमुख म्हणून राज्यात ठिकठिकाणी वावरत असताना मंगेश चिवटे यांनी स्वतःचे वेगळे राजकीय स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे आंतरवली सराटीमध्ये उपोषण सुरू असताना त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी जाणाऱ्या मंत्र्यांच्या शिष्टमंडळात मंगेश चिवटे अनेकदा सामील होत असत. 

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीकडून ४१९ कोटी वितरीत

दरम्यान, गेल्या अडीच वर्षात ‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षा’द्वारे एकूण ४१९ कोटी पेक्षा अधिक अर्थसहाय्य वितरीत करण्यात आले होते, अशी माहिती चिवटे सोशल मीडियातील पोस्टद्वारे दिली आहे. यात रुग्णांच्या मदतीसाठी एकुण ३८१ कोटी २० लक्ष रुपये, तर नैसर्गिक आपत्ती घटनांमध्ये नुकसान भरपाई मदत म्हणून ३८ कोटी ६६ लक्ष रुपये वितरीत करण्यात आले होते, असं चिवटे यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे.

कोण आहेत रामेश्वर नाईक?

रामेश्वर नाईक हे गिरीश महाजन यांचे विश्वासू सहकारी आहेत. ते गिरीश महाजन यांच्या मतदारसंघात अनेक वर्ष आरोग्य शिबीर आयोजित करत असतात. नाईक हे एका अपघातात गंभीर जखमी झाले असताना आमदार गिरीश महाजन यांनी त्यांना मुंबईत आणून त्यांच्यावर उपचार केले होते. तेव्हापासून नाईक हे महाजन यांच्यासोबत काम करत असून प्रामुख्याने आरोग्य सेवेचे काम करतात. विविध खासगी कंपन्यांच्या फाऊन्डेशनची मदत घेऊन ते गरीब रुग्णांना मदत करत असतात. राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये आरोग्य शिबिरांचे आयोजन केले आहे.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून मदत कशी मिळवावी

महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम, धर्मादाय रुग्णालये या योजनांचा लाभ मिळू न शकणाऱ्या आणि राज्यात या योजनेत नोंदणीकृत रुग्णालयात उपचार घेणाऱ्या पात्र रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीद्वारे मदत दिली जाते.यात २५ हजार ५० हजार १ लाख आणि २ लाख रुपयांची मदत केली जाते. या योजनेची सविस्तर माहिती आणि अर्जासाठी क्लिक कराः cmrf.maharashtra.gov.in

Whats_app_banner

संबंधित बातम्या