BJP Core Committee Meeting news : भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र विधीमंडळ पक्षाच्या नेतेपदी अपेक्षेप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळं पुढचे मुख्यमंत्री फडणवीसच असतील हे स्पष्ट झालं आहे. आज संध्याकाळीच ते माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्यासोबत राज्यपालांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा करणार आहेत.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपप्रणित महायुतीला बहुमत मिळालं आहे. महायुतीत भाजप हा १३२ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळं मुख्यमंत्रीपद भाजपला मिळणार असल्याचं स्पष्ट झालं होतं. एकनाथ शिंदे यांनी राजीनामा देऊन त्यासाठी मार्गही मोकळा करून दिला होता. मात्र, मंत्रिपदाचा वाटप आणि नवे मुख्यमंत्री कोण यावरून बरेच दिवस खल सुरू होता.
अखेर अनेक बैठकांनंतर या सगळ्यातून मार्ग निघाला. त्यानंतर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांना निरीक्षक म्हणून महाराष्ट्रात पाठवलं. या दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीत भाजपच्या कोअर कमिटीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. त्यामुळं राज्याची सूत्रं पुन्हा एकदा फडणवीस यांच्याकडं आली आहेत.
कोअर कमिटीच्या बैठकीनंतर भाजपच्या आमदारांची बैठक झाली. त्यात केंद्रीय निरीक्षकांच्या समोर सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील यांनी नेतेपदाचा प्रस्ताव मांडला. तर आशिष शेलार आणि रविंद्र चव्हाण यांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिलं. त्यामुळं आता सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे.
भाजपनं मुख्यमंत्रीपद स्वत:कडं ठेवल्यानंतर एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या पक्षाला सत्तेत नेमका किती वाटा मिळणार आणि कोणती खाती मिळणार याविषयी उत्सुकता आहे. मुख्यमंत्रीपद भाजप घेणार असेल तर गृहमंत्रीपद आम्हाला द्यावं अशी आग्रही मागणी शिंदे यांनी केली होती. त्यावर नेमका काय निर्णय झाला आहे हे कळू शकलेलं नाही.
उद्या, ५ डिसेंबर रोजी आझाद मैदानात नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. यावेळी फडणवीस यांच्यासोबत नेमकं कोण शपथ घेणार याविषयी उत्सुकता आहे. एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री होण्यास राजी झाली आहेत का याचंही उत्तर लवकरच मिळणार आहे.
संबंधित बातम्या