मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  election results effect : देवेंद्र फडणवीस मंत्रिपद सोडणार? भाजपच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत व्यक्त केली इच्छा

election results effect : देवेंद्र फडणवीस मंत्रिपद सोडणार? भाजपच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत व्यक्त केली इच्छा

Jun 05, 2024 04:05 PM IST

devendra fadnavis offers to resign : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपच्या झालेल्या दारुण पराभवाची जबाबदारी स्वीकारत देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारली पराभवाची जबाबदारी; मंत्रीपद सोडण्याची व्यक्त केली इच्छा
देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारली पराभवाची जबाबदारी; मंत्रीपद सोडण्याची व्यक्त केली इच्छा

devendra fadnavis offers to resign : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाच्या झालेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून मंत्रिपद सोडण्याची तयारी देवेंद्र फडणवीस यांनी दाखवली आहे. पक्षनेतृत्वाला भेटून ते तशी विनंती करणार आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

खुद्द फडणवीस यांनीच आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. आमचे मुंबईचे अध्यक्ष व राज्याचे अध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांनी दिवसरात्र काम केलं. कार्यकर्त्यांना उत्साहित करण्याचं काम केलं. मात्र जागा कमी आल्या आहेत ही वस्तुस्थिती मान्य करावी लागेल, असं फडणवीस म्हणाले.

लोकसभेच्या संपूर्ण निवडणुकीत महाराष्ट्र भाजपचं नेतृत्व मी करत होतो. त्यामुळं जो काही पराभव झाला आहे. जागा कमी आल्या आहेत त्याची सर्व जबाबदारी माझी आहे. मी कमी पडलो. हे मी स्वीकारतो. ज्या काही त्रुटी राहिल्या आहेत, त्या भरून काढण्याचा प्रयत्न पुढच्या काळात करणार आहे. विधानसभेच्या तयारीसाठी मला आता पूर्णवेळ उतरायचं आहे. त्यामुळं मला सरकारमधून मुक्त करावं अशी विनंती पक्षनेतृत्वाला करणार आहे, असं फडणवीस यांनी सांगितलं. ‘मला पक्ष संघटनेसाठी पूर्ण वेळ देता यावा या हेतूनं मी तशी इच्छा व्यक्त करणार आहे. त्यांच्या सल्ल्यानं मी पुढं काम करेन,’ असंही त्यांनी सांगितलं.

महाविकास आघाडीपेक्षा आम्हाला मतं जास्त

लोकसभा निवडणुकीत भाजपच्या झालेल्या पराभवाचं त्यांनी विभागवार विश्लेषण केलं. महाविकास आघाडीला जास्त जागा मिळाल्या असल्या तरी भाजप आणि महायुतीला मिळालेली मतं खूपच जास्त आहेत. मुंबईतही भाजपला महाविकास आघाडीपेक्षा जास्त मतं मिळाली आहेत. मुंबईत महाविकास आघाडीला २४ लाख मतं मिळाली आहेत, तर आम्हाला २६ लाख मतं मिळाली आहेत, असं ते म्हणाले. राज्यात आमच्या अनेक जागा अगदी थोड्या फरकानं पडल्या आहेत, असंही त्यांनी सांगितलं. महाविकास आघाडीला या निकालाचा मानसिक फायदा नक्की होईल, पण तळागाळात आमचा पक्ष अजूनही मजबूत आहे. आम्ही आमच्या त्रुटी दूर करून पुन्हा एकदा लोकांपुढं जाऊ, असं फडणवीस म्हणाले.

संविधान व मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरील प्रचाराचा फटका

संविधान बदलण्याच्या विरोधकांच्या प्रचाराचा जनमानसावर मोठा परिणाम झाला. मराठा आरक्षण देण्यास आलेल्या अपयशाचाही आम्हाला फटका बसला. कांद्याच्या भावाच्या मुद्द्याचाही प्रचार झाला. सरकारनं आरक्षण दिल्यानंतरही मराठा आरक्षणाच्या बाबतीत वेगळा प्रचार झाला. त्याला आम्ही प्रभावीपणे उत्तर देऊ शकलो नाही. त्याचा फटका आम्हाला बसला. मराठवाड्यातील निवडणुकीत ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणावर झालं, असंही फडणवीस म्हणाले.

टी-२० वर्ल्डकप २०२४