मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  'आषाढीला विठ्ठल पूजा फडणवीस करणार', भाजप खासदाराचा दावा

'आषाढीला विठ्ठल पूजा फडणवीस करणार', भाजप खासदाराचा दावा

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Jun 28, 2022 01:04 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आषाढी एकादशीला विठ्ठलाची महापुजा केली जाते. सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता यंदा ही पुजा कोण करणार याचीच चर्चा रंगली आहे.

यंदा शासकीय पुजेला मुख्यमंत्री म्हणून कोण जाणार?
यंदा शासकीय पुजेला मुख्यमंत्री म्हणून कोण जाणार? (फोटो - हिंदुस्तान टाइम्स)

शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पुकारलेल्या एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळण्याची शक्यता आहे. राज्यातील या राजकीय भूकंपानंतर भाजपकडून (BJP) सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू झाल्याचं म्हटलं जात आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे आज पुन्हा दिल्लीला रवाना झाले आहेत. सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) १२ जुलैपर्यंत बंडखोर आमदारांना दिलासा दिल्यानं आता हालचालींना वेग आला आहे. दरम्यान, राज्यात आता आषाढी वारी (Ashadhi Wari) सुरू असून पंढऱपूरला एकादशीला विठ्ठलाची पूजा मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेच (Uddhav Thackeray) करणार की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार याची चर्चा रंगली आहे.

भाजप खासदार प्रताप पाटील यांनी पंढरपूरमध्ये बोलताना त्यांनी म्हटलं की,"येत्या दोन ते तीन दिवसात राज्यात भाजपचे सरकार येईल." राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करण्यासाठी रवाना झाले आहेत. त्यातच दुपारी एकनाथ शिंदे बंडखोर आमदारांची गुवाहाटीत बैठक घेणार असून त्यावेळी महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.

पंढरपूरला विठ्ठल दर्शनासाठी गेल्यानंतर नांदेडमधील भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दावा केला की, "येत्या दोन तीन दिवसात भाजपचं सरकार येईल. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे बंडखोर आमदार यांच्या मदतीने भजाप सत्तेत येईल."

खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी म्हटलं की, "मी गेल्या १५ ते १६ वर्षांपासून पांडुरंगाच्या दर्शनाला येतो. पांडुरंगाला साकडं घातलंय की, आषाढीच्या पुजेला देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री म्हणून येऊदेत." आषाढी एकादशीला दरवर्षी मुख्यमंत्र्यांना पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या शासकीय पुजेचा मान असतो.

WhatsApp channel

संबंधित बातम्या