airport near Tadoba tiger reserve : देशात प्रसिद्ध असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पा शेजारी विमानतळ उभारण्यास राज्याच्या पर्यावरण खात्याने विरोध केला आहे. काही महिन्यांपूर्वी राष्ट्रीय वन्यजीव मंडळाने (NBWL) चंद्रपूरजवळ विमानतळ बांधण्याचा प्रस्ताव नाकारला होता. या विमानतळाचा ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील वाघांच्या अधिवासावर परिणाम होऊ शकतो, असे कारण त्यावेळी देण्यात आले होते. दरम्यान, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य वन्यजीव मंडळाला विमानतळाचा प्रस्ताव पुन्हा पाठवण्यास सांगितले आहे.
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे चंद्रपूरचे आहेत. या ठिकाणी विमानतळ उभारणीसाठी ते ते आग्रही आहेत. येथे विमानतळ झाल्यास पर्यटनाला चालना मिळेल, असा दावा त्यांचा आहे. नागपूर येथे विमानतळ आहे. मात्र, हे विमानतळ चंद्रपूर शहरापासून सुमारे दोन तासांच्या अंतरावर आहे.
या वर्षी सप्टेंबरमध्ये, व्याघ्र कॉरिडॉर आणि संरक्षित जंगलांमधील प्रकल्पांवर निर्णय घेणारी सर्वोच्च संस्था राष्ट्रीय वन्यजीव मंडळाने चंद्रपूरमधील राजुरा तालुक्यातील विहिरगाव आणि मुर्ती गावात ग्रीनफिल्ड विमानतळ बांधण्याचा राज्य सरकारच्या महाराष्ट्र विमानतळ विकास महामंडळाचा प्रस्ताव नाकारला होता. राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या स्थायी समितीने वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या सर्वेक्षण अहवालाचा संदर्भ देत ही जागा वाघांच्या अधिवासाची असून यामुळे या ठिकाणी विमानतळाच्या बांधकामासाठी प्रस्तावित जागेचा विचार करता येऊ शकणार नाही असे म्हटले होते.
दरम्यान, राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या निर्णयाला न जुमानता या ठिकाणी विमानतळ उभारण्याच्या हालचाली पुन्हा तीव्र करण्यात आल्या आहेत. चंद्रपूरजवळील मोरवा येथे एक छोटे विमानतळ आहे. परंतु या विमानतळाचा विस्तार करण्यास स्थानिक प्रशासनाला व्यवहार्य वाटत नाही.
ताडोबा जवळ प्रस्तावित असणाऱ्या ग्रीनफिल्ड विमानतळासाठी वनजमिनीचा मोठा भाग लागणार आहे. येथे विमानतळ उभारणीसाठी प्रस्तावित क्षेत्र ६३.५४० हेक्टर एवढे आहे. त्यापैकी २५.२७ हेक्टर संरक्षित वनजमीन आणि ३८.२७ हेक्टर आरक्षित वनजमीन आहे. या बांधकामासाठी परिसरातील ३,३९२ झाडे तोडावे लागणार आहे.
या वर्षी ऑक्टोबरमध्ये झालेल्या स्टेट बोर्ड फॉर वाइल्डलाइफ (SBWL) च्या बैठकीत विमानतळाचा मुद्दा पुन्हा चर्चेला आला. दरम्यान, विहीरगाव-मुर्ती येथे प्रस्तावित विमानतळचा प्रस्ताव हा राष्ट्रीय वन्यजीव मंडळाने नाकारला होता. मात्र, हा प्रस्ताव एनबीडब्ल्यूएलच्या स्थायी समितीकडे फेरविचारासाठी पाठवावा, असे निर्देश एसबीडब्ल्यूएलचे उपाध्यक्ष मुनगंटीवार यांनी दिले.
हा प्रस्ताव पाठवताना नागपूर विमानतळापासून प्रस्तावित विमानतळाचे अंतर, मोरवा विमानतळाच्या अद्ययावतीकरणाच्या मर्यादा आणि व्याघ्र प्रकल्पातून हवाई पट्टी जात नसल्याचे तपशील अधोरेखित करावे लागणार आहेत, असे या बैठकीच्या इतिवृत्तात म्हटले आहे.
राज्य सरकारने राष्ट्रीय वन्यजीव मंडळाला असेही कळवले की, राजुरा स्थळांव्यतिरिक्त, राज्याने तीन पर्यायी स्थळांचा विचार केला होता. परंतु या ठिकाणी असलेल्या अति उच्च उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या, कारखान्यांची धुराडी आणि टेकड्यांसारख्या अडथळे असल्याने या ठिकाणी विमानतळ करण्यायोग्य वातावरण नव्हते. प्रस्तावित जागा आधीच अस्तित्वात असलेल्या मोरवा विमानतळापासून ३९ किमी अंतरावर आहे.