राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार नवाब मलिक सध्या नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान काल, गुरुवारी सत्ताधारी बाकांवर बसल्याने महायुती सरकारचा प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपने तीव्र आक्षेप घेतला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट अजित पवार यांना पत्र लिहून स्पष्ट नाराजी व्यक्त केली होती. परंतु आज, शुक्रवारी, अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीसुद्धा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार नवाब मलिक सत्ताधारी बाकांवर बसलेले दिसले. दरम्यान, आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.
दरम्यान, आमदार नवाब मलिक यांना सत्ताधारी महायुतीत घेण्याबाबत खुली नाराजी व्यक्त करणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पत्र मिळाले असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांना दिली. परंतु पत्र वाचल्यानंतर त्यावर निर्णय घेतला जाईल, असं त्यांनी स्पष्ट केले. अजित पवार यांनी याप्रकरणी माध्यमांना इतर तपशील देण्यास मात्र नकार दिला.
दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष एकच असून राष्ट्रवादीचे सर्व आमदार आमचेच असल्याचे मत मंत्री अनिल पवार यांनी व्यक्त केले. त्यामुळे एखाद्या पक्षाचा आमदार सभागृहात कुठे बसेल याचा निर्णय तो पक्षच घेईल, असंही ते म्हणाले. नवाब मलिक राष्ट्रवादीचे असल्याने ते सत्ताधारी बाकांवर बसले आहेत, असं स्पष्टीकरण पवार यांनी दिलं.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या सार्वजनिक पत्रानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस-अजित पवार गट बॅकफूटवर गेल्याचे दिसून आले. अजित पवार गटाचे सरचिटणीस, खासदार सुनील तटकरे यांनी काल, उशिरा रात्री ट्विटरद्वारे या प्रकरणावर स्पष्टीकरण जारी केले. ‘आमदार नवाब मलिक हे आमचे अनेक वर्षांपासूनचे ज्येष्ठ सहकारी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत मधल्या कालावधीत घडलेल्या घडामोडींशी त्यांचा कुठलाही संबंध नाही. आजारपणाच्या मुद्द्यावर त्यांना जामीन मिळाल्यानंतर जुने सहकारी म्हणून त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आमची भेट झाली. आम्ही त्यांच्याशी कुठलीही राजकीय चर्चा केलेली नाही. आज विधानसभेत आल्यानंतर जुन्या सहकार्यांशी त्यांचा संवाद आणि भेट होणे स्वाभाविक आहे.’ असं स्पष्टीकरण तटकरे यांनी केलं.