मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  देवेंद्र फडणवीस रात्री उशिरा वर्षा बंगल्यावर; मुख्यमंत्र्यांसोबत कॅबिनेट विस्ताराबाबत तासभर खलबतं

देवेंद्र फडणवीस रात्री उशिरा वर्षा बंगल्यावर; मुख्यमंत्र्यांसोबत कॅबिनेट विस्ताराबाबत तासभर खलबतं

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Oct 26, 2022 10:16 AM IST

Cabinet Expansion Maharashtra : उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मध्यरात्री मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानं सरकारच्या दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत.

Cabinet Expansion Maharashtra
Cabinet Expansion Maharashtra (Anshuman Poyrekar/HT PHOTO)

Cabinet Expansion Maharashtra : गेल्या काही दिवसांपासून शिंदे-फडणवीस सरकारचा दुसरा कॅबिनेट विस्तार लवकरच होणार असल्याच्या चर्चांना उधान आलं आहे. त्यातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यरात्री वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असून त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. याशिवाय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या या भेटीत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. शिंदे आणि फडणवीस यांच्या बंद दाराआड तासभर चर्चा झाली असून त्यात मंत्रिमंडळ विस्तार आणि महामंडळावर कुणाच्या नियुक्त्या करायच्या, याबाबत खलबतं झाली आहे. त्यामुळं आता राज्य मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार लवकरच होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस हे रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी दाखल झाले. त्यावेळी तिथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह त्यांच्या पत्नी, खासदार श्रीकांत शिंदे त्यांच्या पत्नीही उपस्थित होत्या. यावेळी कौटुंबिक चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी बंद दाराआड तासभर चर्चा केली आहे.

दोन्ही नेत्यांच्या या बैठकीत मंत्रिमंडळाच्या विस्तारासह आगामी मुंबई महापालिकांच्या निवडणुका आणि महामंडळाच्या नियुक्त्यांबाबत चर्चा झाल्याचं समजतं. याशिवाय एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवरही येत्या काही दिवसांत सुनावणी होणार असल्यानं दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

IPL_Entry_Point