Deepak Sawant Join Shinde Group : उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय सुभाष देसाई यांचे चिरंजीव भूषण देसाई यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आता माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी देखील आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यात ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. उद्धव ठाकरेंनी कोणतंही कारण नसताना मला तीन वर्ष घरी बसवलं, काम करण्याची इच्छा असतानाही शिवसेनेचा प्लॅटफॉर्म काढून घेण्यात आल्याचा आरोप दीपक सावंत यांनी केला आहे. त्यामुळं आता यावरून ठाकरे आणि शिंदे गटात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी रंगण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत बोलताना म्हणाले की, शिवसेना प्रमुखांनी मला भरपूर दिलं आहे, त्यासाठी मी त्यांचे नेहमीच आभार मानतो. मला आमदार केलं, त्यानंतर उद्धव ठाकरेंनी मला मंत्री केलं. परंतु त्यानंतर उद्धव ठाकरेंनी कोणतंही कारण नसताना तीन वर्ष मला घरी बसवून ठेवलं. त्याचं शल्य मला लागलं होतं. आपण काम करू शकत असतानाही रिटायर करण्यात आलं जी मला नको होती, असं म्हणत दीपक सावंत यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बाळासाहेबांचं नाव असल्यामुळं मला काम करण्याची प्रेरणा त्यांच्याकडून मिळाल्याचंही दीपक सावंत म्हणालेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मी पालघरमध्ये अनेक वर्ष काम केलं आहे. एकाच मंत्रिमंडळात आम्ही काम केलेलं असून त्यांच्या कामाचा वेग मला चांगलाच माहिती आहे. त्यांच्यासारखा मुख्यमंत्री राज्याला लाभला हे आपलं भाग्य आहे, असं म्हणत दीपक सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं तोंडभरून कौतुक केलं आहे. बाळासाहेबांच्या शिवसेनेसाठी काम करण्याचं ठरवलं असून मला बाकी कोणत्याही गोष्टीचा मोह नाहीये. गेल्या तीन वर्षांपासून मी काम मागतोय, परंतु मला कोणतीही जबाबदारी देण्यात आली नाही. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी माझ्यावर विश्वास दाखवून संधी दिली, त्यांचा विश्वास सार्थ ठरवणार असल्याचंही दीपक सावंत यांनी म्हटलं आहे.