Sai Resort Demolition news : शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्यावर घोटाळ्याचे आरोप केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब यांच्या रिसॉर्टवर कारवाई सुरू झाली आहे. दापोली (Dapoli) इथं ही कारवाई सुरू असून भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी या कारवाईचे फोटो, व्हिडिओ शेअर केले आहेत.
अनिल परब (Anil Parab) व सदानंद कदम (Sadanand Kadam) यांनी सीआरझेडच्या नियमांचं उल्लंघन करून दापोलीतील मुरुडच्या समुद्र किनाऱ्यावर साई रिसॉर्ट बांधल्याचा आरोप होता. हे रिसॉर्ट बांधताना २०० मीटरच्या आत बांधकाम केल्याचा आक्षेप होता. या प्रकरणी माजी खासदार किरीट सोमय्या यांनी १४ नोव्हेंबर २०२२ रोजी दापोली पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. त्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दोन दिवसांपूर्वीच किरीट सोमय्या यांनी रत्नागिरीत जाऊन जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि पर्यावरण विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. त्यानंतर काल अनिल परब यांनी रामदास कदम यांच्यावर भूखंड घोटाळ्याचे आरोप केले होते. सोमय्या यांनी रामदास कदम यांच्या घोटाळ्याच्या विरोधातही आवाज उठवावा आणि ईडी चौकशीची मागणी करावी, असं अनिल परब म्हणाले होते. तसंच, येत्या काळात रामदास कदम यांचे १२ ते १३ घोटाळे बाहेर काढू, असा इशारा दिला होता. त्यानंतर आज परब यांच्याच रिसॉर्टवर कारवाई झाली आहे.
अनिल परब यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन माजी मंत्री व शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांच्यावर भूखंड घोटाळ्याचे गंभीर आरोप केले होते. रामदास कदम यांनी आपल्या पदांचा गैरवापर करून खेड नगरपालिकेचा भूखंड हडपल्याचा आरोप परब यांनी केला होता. या गैरव्यवहाराची कागदपत्रंच अनिल परब यांनी दाखवली. तसंच, खेडमधील जांबुर्डे गावात जमीन भूसंपादन करण्यात आलं होतं. त्या गावात रामदास कदम यांच्या मुलांची १५ गुंटे जागा होती. ह्यांनी सरकारकडून १८.५ गुंट्याचा मोबदला वसूल केला. संपादन केल्यानंतर तोच प्लॉट एनए करण्याची परवानगी त्यांनी मागितली. भूसंपादन झालेली जमीन एनए करण्याची परवानगी कशी काय मागितली जाऊ शकते,' असा सवाल अनिल परब यांनी केला होता. येत्या काही दिवसांत आणखी १२ ते १३ घोटाळे उघड करेन, असा इशाराही परब यांनी केला.
संबंधित बातम्या