Nagpur temperature : नागपूरची अक्षरश: भट्टी झाली! तापमानाचा पारा ५६ अंशांवर, हवामान विभागालाही टोटल लागेना!
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nagpur temperature : नागपूरची अक्षरश: भट्टी झाली! तापमानाचा पारा ५६ अंशांवर, हवामान विभागालाही टोटल लागेना!

Nagpur temperature : नागपूरची अक्षरश: भट्टी झाली! तापमानाचा पारा ५६ अंशांवर, हवामान विभागालाही टोटल लागेना!

May 31, 2024 03:37 PM IST

Nagpur temperature : देशात सर्वाधिक तापमानाचा उच्चांक नोंदवणाऱ्या दिल्लीला मागे टाकत नागपूरनं ५६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद केली आहे.

नागपूरची अक्षरश: भट्टी झाली! दिल्लीलाही मागे टाकलं! तापमानाचा पारा ५६ अंशांवर
नागपूरची अक्षरश: भट्टी झाली! दिल्लीलाही मागे टाकलं! तापमानाचा पारा ५६ अंशांवर

Nagpur temperature news : मान्सून केरळपर्यंत आला… लवकरच संपूर्ण भारतात येणार अशी चर्चा चालू असली तरी तापमानाचा पारा कमी होण्याचं नाव घेत नाहीए. उष्णतेच्या झळा जीव कातावून टाकत आहेत. महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरला याचा सर्वात मोठा फटका बसला आहे. नागपूरची अक्षरश: भट्टी झाली आहे. तिथं काल, गुरुवारी तब्बल ५६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. 

देशाची राजधानी दिल्लीतील मंगेशपुरी भागात दोन दिवसांपूर्वी ५२.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली होती. हा देशभरातील तापमानाचा उच्चांक होता. त्यामुळं दिल्लीत भीतीचं वातावरण होतं. मात्र, आता नागपूरनं दिल्लीलाही मागे टाकलं आहे. इथल्या तापमानात अनपेक्षित वाढ झाली आहे. उष्णतेमुळं लोक हैराण झाले असून, एवढी उष्णता का व कशी होत आहे, हेच कळेनासं झालं आहे. 

हवामान विभागही संभ्रमात

भारतीय हवामान विभागानंही (IMD) वाढत्या उष्णतेबाबत चिंता व्यक्त केली आहे. दिल्लीतील तापमान ५२.९ अंशांवर पोहोचल्यावर आयएमडीनं तपासाचे आदेश दिले होते. आता नागपुरातही तापमान मोजताना काही चूक झाली का, याची चौकशी सुरू आहे. टाइम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार, हवामान विभागानं नागपुरात स्थापन केलेल्या चार स्वयंचलित हवामान केंद्रांपैकी दोन केंद्रांनी ५० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान दाखवलं आहे. हे तापमान दिल्लीतील विक्रमी तापमानापेक्षाही जास्त आहे. 

कोणत्या केंद्रावर किती तापमानाची नोंद?

नागपूरच्या उत्तर अंबाझरी रोडपासून दूर असलेल्या रामदासपेठ इथं पीडीकेव्हीच्या २४ हेक्टर खुल्या कृषी क्षेत्राच्या मध्यभागी स्थापित नागपूर AWS मध्ये ५६ अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं आहे. याशिवाय सोनेगावच्या प्रादेशिक हवामान केंद्रात ५४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. वर्धा रोडवरील खापरी येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच्या शेतात असलेल्या तिसऱ्या हवामान केंद्रात ४४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर रामटेक AWS इथं ४४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

नागपूरकरांमध्ये अस्वस्थता

गेल्या दोन आठवड्यांपासून मध्य भारत, उत्तर भारत आणि पूर्व भारतात तीव्र उष्णता आहे. 'रेमल' चक्रीवादळाचं आगमन आणि केरळमध्ये मान्सूनचं नियोजित वेळेच्या तीन दिवस आधी आगमन झाल्यानंतर आयएमडीनं आता तापमानात हळूहळू घट होईल आणि मान्सून पुढं सरकल्यानं लोकांना दिलासा मिळेल, असं हवामान विभागानंच म्हटलं होतं. मात्र, नागपुरातील वाढत्या पाऱ्यामुळं स्थानिक लोक अस्वस्थ झाले आहेत. तथापि, काल दिल्लीचं कमाल तापमान ४५ अंशांच्या आसपास नोंदवलं गेलं. हा आकडा आयएमडीच्या अंदाजाशी मिळताजुळता आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर