मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Deepak Kesarkar: राणेंमुळं सुशांत प्रकरणात आदित्य ठाकरेंची बदनामी: दीपक केसरकर

Deepak Kesarkar: राणेंमुळं सुशांत प्रकरणात आदित्य ठाकरेंची बदनामी: दीपक केसरकर

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Aug 05, 2022 06:32 PM IST

Deepak Kesarkar on Shiv Sena BJP Split: शिवसेना-भाजप पुन्हा जवळ न येण्यास नारायण राणे कारणीभूत आहेत असा अप्रत्यक्ष आरोप एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केला आहे.

Deepak Kesarkar - Narayan Rane
Deepak Kesarkar - Narayan Rane

Deepak Kesarkar blames Narayan Rane for Shiv Sena BJP Rift: शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे भाजपशी जुळवून घेण्यास तयार होते. मात्र, अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणात नारायण राणे यांनी केलेली आदित्य ठाकरे यांची बदनामी व नंतर त्यांना मिळालेलं मंत्रीपद यामुळं ही चर्चा थांबली,' असा गौप्यस्फोट एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केला आहे. शिवसेना-भाजप युती पुन्हा न होण्यास राणे जबाबदार आहेत, असं त्यांनी अप्रत्यक्षपणे म्हटलं आहे. 

मुंबईत आज झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ‘सुशांतसिंह राजपूत प्रकरण महाराष्ट्रात घडलं, तेव्हा आदित्य ठाकरे यांची बदनामी करण्याचा प्रयत्न झाला. त्यात सध्याचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पत्रकार परिषदांचा मोठा वाटा होता. ठाकरे कुटुंबीयांवर प्रेम करणाऱ्या आमच्यासारख्या लोकांची मनं सुद्धा यामुळं दुखावली गेली होती. मी स्वत: याविषयी काहीतरी करायचं ठरवलं. भाजपच्या अनेक नेत्यांशी माझे संबंध आहेत. मी त्यांना याबाबत विचारणा केली होती. भाजपचा अशा प्रकारच्या बदनामीला विरोध होता असंही तेव्हा मला सांगण्यात आलं,’ असं केसरकर म्हणाले.

'व्यक्तीगत आरोप हे एखाद्या तरुणाच्या राजकीय भवितव्यासाठी योग्य नसतात. त्यामुळं त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना किती वेदना होऊ शकतात हे आपण समजू शकतो. या सगळ्या घडामोडींमुळं व्यथित होऊन मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संपर्क केला. त्यांच्या कानावर ही वस्तुस्थिती घातली. त्यांनी कदाचित माझी पूर्ण माहिती काढली असावी. त्यामुळंच त्यांनी माझं पूर्ण म्हणणं ऐकलं. त्यानंतर मोदी व उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा सुरू झाली. सगळे मुद्दे आम्ही एकमेकांपर्यंत पोहोचवत होतो. उद्धव ठाकरे हे मोदी यांच्याशी संबंध जपण्यासाठी तयार होते. त्यांनी राजीनामा देण्याचीही तयारी केली होती, पण पुढं राणेंना मंत्रीपद मिळालं. त्यामुळं उद्धव ठाकरे व शिवसैनिक नाराज झाले. भाजपच्या १२ आमदारांचं निलंबन हेही परिस्थिती बिघडण्यास कारणीभूत ठरलं, असं केसरकर यांनी सांगितलं.

IPL_Entry_Point