शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर एक वक्तव्यामुळे वादात अडकले आहेत. कोल्हापुरात पूर आला त्यावेळी सुदैवाने मी शिर्डीत होतो. त्यामुळे कोल्हापुरात पूर आला नसल्याचा दावा केसरकरांनी केला आहे. शिर्डीत देवाकडे मी प्रार्थना करत होतो त्यामुळे कोल्हापूरकरांवरचे महापुराचे संकट टळलं, असा अजब दावा केसरकरांनी केल्यानंतर त्यांच्यावर टीका होऊ लागली आहे. केसरकरांच्या दाव्यावर छगन भुजबळांनीही खोचक टोला लगावला आहे.
कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांना कोल्हापुरावर ओंघावणारं महापुराचं संकट टळल्याबाबत विचारण्यात आल्यावर त्यांनी दिलेल्या उत्तरामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.
काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे कोल्हपुरात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. पंचगंगा नदीची पाणीपातळी वाढल्याने तसेच राधानगरी धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग यामुळे कोल्हापूरवर महापुराचं संकट ओढावलं होतं, मात्र पावसाचा जोर ओसरला आणि कोल्हापूरवरचं महासंकट दूर झालं. यावरून कोल्हापूरचे पालकमंत्री आणि राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी अजब विधान केलं आहे.
राधानगरी धरणातून यंदा मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग होऊनही अनेक गावं पाण्याखाली का गेली नाहीत? असा प्रश्न मंत्री दीपक केसरकर यांना विचारण्यात आला. तेव्हा शिर्डीमध्ये प्रार्थना केल्यामुळे पूर आला नाही, असं वक्तव्य केसरकर यांनी केलं.
केसरकरांच्या या वक्तव्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी टोला हाणला आहे. तुम्ही इकडे या आनंद आहे, देवाचा धावा करा आणि आमच्या येथील धरणं लवकरात लवकर भरू द्या, अशी उपहासात्मक प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे.
संबंधित बातम्या