मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Raj Thackeray: फडणवीसांना लिहिलेल्या पत्राची चर्चा सुरू असतानाच राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

Raj Thackeray: फडणवीसांना लिहिलेल्या पत्राची चर्चा सुरू असतानाच राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Oct 20, 2022 03:37 PM IST

Raj Thackeray on Wet Drought: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून शेतकऱ्यांच्या हालाखीकडं त्यांचं लक्ष वेधलं आहे.

Raj Thackeray
Raj Thackeray

Raj Thackeray on Farmers Distress: अंधेरी पोटनिवडणुकीच्या संदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पत्रामुळं उडालेला राजकीय धुरळा बसत असतानाच आता राज यांनी आणखी एक पत्र लिहिलं आहे. अर्थात, हे पत्र राजकीय विषयाशी संबंधित नसून शेतकऱ्यांच्या परिस्थितीकडं लक्ष वेधणारं आहे.

राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून हे पत्र लिहिलं आहे. त्यात त्यांनी परतीच्या पावसामुळं झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. तसंच, राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडं केली आहे.

राज यांनी पत्रात संपूर्ण परिस्थिती विषद केली आहे. 'ह्या वर्षी मान्सूनचा मुक्काम लांबला आणि त्यात परतीच्या पावसानं तर कहर केला. ह्या परतीच्या पावसानं खरीप पिकांचं अपरिमित नुकसान केलं आहे आणि एकूणच हवामान पाहता रब्बी हंगामाच्या बाबतीतही शेतकरी बांधव चिंतातूर आहे. ऐन पीक काढणीच्या वेळेस हा पाऊस आल्यामुळं शेतकन्याच्या डोळ्यादेखत पीक वाया गेलं आहे. सरकारनं नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत हे चांगलंच आहे, पण तेवढ पुरेसं नाही. सध्याची परिस्थिती व राज्यभरात शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान पाहता सरकारनं 'ओला दुष्काळ' जाहीर करायला हवा,' असं त्यांनी म्हटलं आहे.

'सरकारनं पंचनाम्याचे आदेश दिलेले आहेत, पण पूर्वानुभव असा आहे की सरकार पंचनाम्याचे आदेश देतं, पण प्रशासकीय पातळीवर ते पंचनामे नीट होत नाहीत आणि गरजू शेतकरी नेहमीच उपेक्षित राहतो. त्यामुळं सरकारनं हे पंचनामे नीट होतील हे पहावं आणि परिस्थितीचा युद्धपातळीवर आढावा घेऊन 'ओला दुष्काळ' जाहीर करावा. तसंच, कोरडवाहू आणि बागायती शेतीसाठी शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी दिली जाणारी नुकसान भरपाई पुरेशी नसल्यानं तिचा देखील पुनर्विचार करावा, अशी मागणी राज यांनी केली आहे.

शेतकऱ्यांची दिवाळीही आनंदात जाऊ द्या

'दिवाळी हा आनंदाचा सण आहे. लॉकडाऊनच्या संकट काळानंतर शेतकरीही दिवाळी धूमधडाक्यात करण्याच्या मनस्थितीत असेल. अशा वेळी त्यांना दिलासा देऊन त्यांचीही दिवाळी अतिशय आनंदात साजरी होईल ह्याकडं राज्य सरकारनं कटाक्षानं लक्ष द्यावं, अशी विनंती त्यांनी पत्राच्या शेवटी केली आहे.

IPL_Entry_Point

विभाग