Maharashtra Politics: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने २३७ जागा जिंकल्या. यामुळे राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होणार, हे निश्चित झाले आहे. मात्र, अजूनही राज्याच्या मुख्यमंत्र्याचे नाव अद्याप जाहीर झालेले नाही. महायुतीमधील तिन्ही पक्षाचे आमदार हे आपल्या नेत्यांसाठी देव पाण्यात ठेऊन आहेत. दरम्यान, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाबाबत दिल्लीत निर्णय झाला असून राज्याचे मुख्यमंत्रीपद भाजपकडेच राहणार असल्याचे समजत आहे. या निर्णयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज झाल्याची माहिती समोर आली. त्यांनी सर्व भेटीगाठी रद्द केल्याचे समजत आहे.
देवेंद्र फडणवीस हे भाजपकडून मुख्यमंत्रिपदाचे सर्वात मोठे दावेदार आहेत. दरम्यान, अजित पवार यांना मुख्यमंत्रीपद मिळावे, असे राष्ट्रवादीच्या आमदारांची इच्छा आहे. तर, एकनाथ शिंदे हेच पुन्हा मुख्यमंत्री होतील, असा दावा शिवसेना आमदार करत आहेत. मात्र, राज्याचे मुख्यमंत्रीपद नेमके कोणाला मिळणार? हा निर्णय गुलदस्त्यात आहे. परंतु, मुख्यमंत्रीपद हे भाजपकडेच राहणार, असा निर्णय दिल्लीत झाला आहे. म्हणजेच, देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे पुढील मुख्यमंत्री असतील, हे जवळपास निश्चित झाले आहे. परंतु, याआधी भाजपने मुख्यमंत्रीपदाबाबत धक्कादायक निर्णय घेतले आहेत. दिल्लीतील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून कोणाचे नाव समोर येते? हे पाहणे औत्सुक्याचे आहे. गृहमंत्री अमित शहा मुंबईत येऊन मुख्यमंत्रीपदाच्या नावाची घोषणा करणार आहेत.
भाजपकडेच राज्याचे मुख्यमंत्रीपद राहील हे निश्चित झाल्याने एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे. दिल्लीतून निरोप मिळाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी सायंकाळनंतर सर्व भेटीगाठी रद्द केल्याचे समजत आहे. यामुळे एकनाथ शिंदे महायुतीसोबत राहणार की वेगळा विचार करतील, हे येत्या दिवसांत स्पष्ट होईल.
दरम्यान, बिहारमध्ये जेडीयूला कमी जागा मिळाल्यानंतरही भाजपने नितीश कुमार यांना मुख्यमंत्रिपदावर कायम ठेवले, त्याचप्रमाणे शिवसेना नेते आता एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदावर कायम ठेवण्याची मागणी करत आहेत. २०२० च्या अखेरीस बिहारमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या, तेव्हा भाजपने ८० जागा जिंकूनही ४५ जागा जिंकलेल्या नितीशकुमार यांना मुख्यमंत्री केले. यामागचा तर्क असा होता की, निवडणुकीपूर्वी नितीशकुमार यांना मुख्यमंत्रिपद देण्यात आले होते, त्यामुळे भाजपने अधिक जागा जिंकूनही त्यांना मुख्यमंत्रिपदावर कायम ठेवले.
शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी सोमवारी एक वक्तव्य केल्यानंतर देशभरात बिहार मॉडेलची चर्चा झाली. बिहार मॉडेलचा उल्लेख करताना ते म्हणाले की, 'एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावर कायम राहावे, जिथे विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीने घवघवीत यश मिळवले. शिवसेनेचे प्रवक्ते म्हस्के यांनी पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, ज्याप्रमाणे बिहारमध्ये भाजपने संख्याबळाकडे लक्ष दिले नाही आणि जेडीयू नेते नितीशकुमार यांना मुख्यमंत्री बनवले, त्याप्रमाणे शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावर राहावे, असे आम्हाला वाटते. महायुतीचे वरिष्ठ नेते अंतिम निर्णय घेतील', असेही ते म्हणाले.