Deccan Queen railway fire news : पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या डेक्कन क्वीनमध्ये मोठा अपघात होता होता सुदैवाने टळला. आज सकाळी अचानक ही गाडी पुण्याहून मुंबईला जाण्यासाठी निघाली असतांना वाटेत या गाडीच्या वातानुकूलित डब्यातून धूर येऊ लागला. ही घटना कर्जत रेल्वे स्थानकाजवळ घडली. या गाडीतील बिघाड दूर केल्यावर ही गाडी पुढे पाठवण्यात आली आहे. या पूर्वीही धूर निघण्याच्या अनेक घटना या गाडीबाबत घडल्या आहेत.
पुणे-मुंबई डेक्कन क्वीन एक्स्प्रेस आज सकाळी पुण्यातून मुंबईकडे निघाली. ही गाडी लोणावळ्यात थांबल्यावर पुढच्या प्रवासाठी ही गाडी मार्गस्त झाली. घाट पार करून ही गाडी पुढे कर्जत जवळ आली असता या स्थानकाच्या आधी या गाडीच्या सी ३ आणि सी ४ या एसी बोगिखालून मोठ्या प्रमाणात धूर येऊ लागला. ही घटना लक्षात येताच प्रवाशांनी आरडा ओरड करून ही गाडी थांबवली. दरम्यान, हा बिघाड दुरुस्त करून यानंतर ही गाडी पुढे सोडण्यात आली. मात्र, या प्रकारामुळे या गाडीला तब्बल ३५ ते ४० मिनिटे उशीर झाला. दरम्यान, हा बिघाड दुरुस्त केल्यावर धूर निघत राहिल्याचे प्रवाशांनी सांगितले.
या बाबत रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा म्हणाल्या, याआधी देखील या गाडीच्या डब्यांना आग लागण्याच्या घटना घडल्या. २०१२ मध्ये गाडीच्या महिला डब्याला आग लागण्याची घटना घडली होती, सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही. तर गेल्या वर्षात २० एप्रिला देखील या गाडीच्या डब्यांखालून धूर निघाल्याने या गाडीला तासभर उशीर झाला हतो. या घटना वारवांवार घडत असल्याने रेल्वेकडून गाडीच्या देखभालीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप देखील शहा यांनी केला आहे.