Worli Crime News : डोक्यावर तब्बल ३६ लाख रुपयांचे कर्ज तसेच नोकरी गेल्याने हे पैसे कसे भरायचे या विवंचनेत असलेल्या मुलाने जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. मात्र, मृत्युनंतर आईचे कसे होईल या चिंतेने तिची हाताने आणि रुमालाने तोंड दाबून हत्या केल्याची घटना वरळी येथे उघडकीस आली आहे. ही घटना गांधीनगर येथील शिवसंकल्प एस.आर.ए. को ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीच्या इमारत क्रमांक ५ मध्ये घडली. या प्रकरणी मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला उपचारासाठी दवाखाण्यात भरती करण्यात आले आहे.
ललिता तिरुगनना संबनधहम (वय ७७) अशी हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. तर या प्रकरणी पेडर रोड परिसरात राहणाऱ्या त्यांचा मुलगा बालषण्मुगम कुप्पूस्वामी (वय ५३) या मुलाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्याने देखील स्वत:वर वार केले असून त्याला रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालषण्मुगमची पत्नी जीएसटी विभागात क्लास टू ऑफिसर आहे. बालषण्मुगम हे स्वतः एका मोठ्या कंपनीत काम करत होते. एप्रिल महिन्यात त्यांची नोकरी गेली. त्यांच्या डोक्यावर तब्बल ३६ लाखांचे कर्ज होते. नोकरी गेल्याने ते बँकेचा हफ्ता भरू शकत नव्हते. दरम्यान, हे कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी बाळकृष्ण हे त्यांच्या आईला भेटण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी पत्नीला फोन करून आत्महत्या करण्याचे विचार डोक्यात येत असल्याचं सांगितलं. दुसऱ्या दिवशी शनिवारी बाळकृष्ण यांच्या पत्नीने त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता. मात्र, त्यांनी फोन उचलला नाही.
अखेर त्यांच्या पत्नीने तातडीने त्यांच्या आईचे वरळीतील घर गाठले. त्यांनी दरवाजा उघडला असता, आतील दृश्य पाहून त्यांना मोठा धक्का बसला. आई व त्यांचे पती बाळकृष्ण हे बेशुद्ध अवस्थेत दिसून आले. तसेच बाळकृष्ण हे जखमी होते. त्यांनी दोघांना तातडीने दवाखान्यात भरती केल. डॉक्टरांनी दोघांना तपासले असता त्यांनी ललिता यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. दरम्यान, पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी केलेल्या चौकशीत, बालषण्मुगम यानेच कर्जाच्या विवंचनेत आईच्या तोंडावर रुमाल ठेवून तिची हाताने नाक तोंड दाबून हत्या केल्याचे पुढे आले. आईची हत्या केल्यावर बाळकृष्ण याने स्वतःवर वार चाकूने वार करत स्वत: आत्महत्या केल्याचे उघड झालं आहे.
पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता, त्यांना चार सुसाइड नोट मिळाल्या. पत्नी, मुलगी व वरळी पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या नावाने या सुसाइड नोट लिहिल्या आहेत. डोक्यावर कर्ज असल्याने बँकेचा हफ्ता भरणे शक्य होत नाही. मी तणावात असून आईचे भविष्यात काय होणार? त्यामुळे आम्ही दोघांनी मिळून आत्महत्येचा निर्णय घेतल्याचे सुसाइड नोटमध्ये लिहिले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.