BEST Bus accident : कुर्ला बस अपघातात गंभीर जखमी झालेल्या भाजी विक्रेत्याची मृत्युशी झुंज अखेर संपली; मृतांचा आकडा आठवर…
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  BEST Bus accident : कुर्ला बस अपघातात गंभीर जखमी झालेल्या भाजी विक्रेत्याची मृत्युशी झुंज अखेर संपली; मृतांचा आकडा आठवर…

BEST Bus accident : कुर्ला बस अपघातात गंभीर जखमी झालेल्या भाजी विक्रेत्याची मृत्युशी झुंज अखेर संपली; मृतांचा आकडा आठवर…

Dec 16, 2024 06:08 PM IST

कुर्ला पश्चिम येथे ९ डिसेंबर रोजी झालेल्या बेस्ट बसच्या अपघातात जखमी झालेला ५५ वर्षीय व्यक्तीचा आज, सोमवारी मृत्यू झाल्याने या अपघातातील मृतांची संख्या आठ झाली आहे.

कुर्ला बेस्ट बस अपघातातील मृतांची एकूण संख्या आठ
कुर्ला बेस्ट बस अपघातातील मृतांची एकूण संख्या आठ

मुंबईतील कुर्ला (पश्चिम) भागात ९ डिसेंबर रोजी बेस्ट बसच्या अपघातात गंभीर जखमी झालेले फझलू रहमान (वय ५५) यांचा आज सोमवारी सकाळी मृत्यू झाला आहे. त्यामुळे या अपघातातील मृतांची संख्या आठ झाली आहे. कुर्ला पश्चिमेच्या प्रचंड गर्दीच्या रस्त्यावर बेस्टच्या इलेक्ट्रिक बसच्या धडकेत ७ जण ठार तर ४२ जण जखमी झाले होते. याशिवाय बसच्या धडकेमुळे अनेक वाहनांचे नुकसान झाले होते. 

या अपघातात जखमी झालेले फजलू रहमान हे महापालिकेच्या सायन रुग्णालयात उपचार घेत होते. मात्र आज अखेर त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. बेदरकारपणे बेस्ट बस चालवल्याच्या संशयावरून पोलिसांनी बस चालक संजय मोरे (वय ५४) याला ताब्यात घेतले आहे. अपघातात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना बेस्ट प्रशासनाकडून प्रत्येकी दोन लाख रुपये आणि जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च उचलणार आहे.

सोमवारी ९ डिसेंबर रोजी कुर्ली पश्चिम रेल्वे स्टेशन रोडवरील आंबेडकर नगर या ठिकाणी भरधाव बेस्ट बसचा भीषण अपघात झाला. या बसने रस्त्यावर चालणाऱ्या तब्बल १० ते १२ जणांना चिरडले होते. या घटनेत सात जण ठार झाले होते. मृतांमध्ये विजय विष्णू गायकवाड (वय ७०), आफ्रीन अब्दुल सलीम शहा (वय १९), अनम शेख (वय २०), कणीज फातिमा गुलाम कादरी (वय ५५), शिवम कश्यप (वय १८), मोहम्मद फारुख चौधरी (वय ५४), मोहम्मद इस्लाम (वय ४९) असे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. तर आज या अपघातात जखमी झालेल्या आठव्या व्यक्तीचा मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. अपघात घडला तेव्हा बसमध्ये तब्बल ६० प्रवासी प्रवास करत होते.

कुर्ला बेस्ट बस दुर्घटनेची पाहणी करण्यासाठी पाच जणांची टीम नेमण्यात आलेली आहे. बेस्टचे मुख्य व्यवस्थापक (परिवहन) रमेश मडावी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती या अपघाताची चौकशी करणार असल्याचे बेस्ट प्रशासनाने गेल्या आठवड्यात जारी केलेल्या निवेदनात म्हटले होते.

चालक मोरे याने इलेक्ट्रिक बस चालविण्यास परवानगी देण्यापूर्वी तीन दिवसांचे प्रशिक्षण घेतल्याचा दावा बेस्ट प्रशासनाने केला आहे. दरम्यान, आरटीओ अधिकाऱ्यांनुसार हा अपघात मानवी चुकांमुळे झाला आहे. शिवाय बस चालकाने इलेक्ट्रिक बस चालवण्याचे नीट प्रशिक्षण न घेतल्यामुळे अपघात झाला असावा.

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर