मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nitin Gadkari Threat Call : नितीन गडकरींना जीवे मारण्याची धमकी; फोन कॉलमध्ये आरोपीकडून दाऊदचा उल्लेख

Nitin Gadkari Threat Call : नितीन गडकरींना जीवे मारण्याची धमकी; फोन कॉलमध्ये आरोपीकडून दाऊदचा उल्लेख

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jan 14, 2023 02:26 PM IST

Nitin Gadkari Threat Call : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्यामुळं खळबळ उडाली आहे. त्यानंतर आता पोलिसांनी प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

Nitin Gadkari Death Threat
Nitin Gadkari Death Threat (MINT_PRINT)

Nitin Gadkari Death Threat : भाजपचे जेष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींनी नितीन गडकरी यांच्या नागपुरमधील जनसंपर्क कार्यालयात तीन वेळा फोन करून त्यांना ठार मारण्याची धमकी दिल्यामुळं महाराष्ट्रासह देशभरात खळबळ उडाली असून त्यानंतर आता पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना धमकीचा फोन आला होता. त्यानंतर आता नितीन गडकरींनाही धमकी फोन आल्यामुळं राज्यात खळबळ उडाली आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपुरातील जनसंपर्क कार्यालयात आज दुपारी एकामागून एक असे तीन फोन कॉल्स आले आहेत. त्यात आरोपींनी नितीन गडकरी यांना ठार मारण्याची धमकी दिली. याशिवाय कुख्यात अतिरेकी दाऊद इब्राहिमच्या नावाचाही उल्लेख आरोपीनं फोन कॉलमध्ये घेतल्यानं यात दहशतवाही संघटनांचा हात असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. त्यामुळं आता नितीन गडकरी यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात येण्याची शक्यता आहे. आरोपींनी ज्या नंबरवरून गडकरींच्या कार्यालयात फोन केला होता, त्या नंबरची चौकशी करण्यात येत असून पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जात आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे नेहमीच अनेक मुद्द्यांवर रोखठोक आणि बिनधास्तपणे भाष्य करत असतात. त्यामुळं त्यांच्या भूमिकांमुळं त्यांना धमकी देण्यात आल्याची शंका व्यक्त केली जात आहे. यापूर्वी उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना त्यांना आरोपींनी मातोश्रीवर फोन करून ठार मारण्याची धमकी दिली होती. याशिवाय एसटी कर्मचाऱ्यांच्या संपकाळात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही बिहारमधील एका माथेफिरुने फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकी देण्यात आल्याचा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केल्याची माहिती समोर आली आहे.

WhatsApp channel