बाप रे..! कोकणातील घाटात पडलेला मृतदेह यायचा तरुणाच्या स्वप्नात, घटनास्थळी गेल्यावर पोलीसही हादरले-dead body and human skull found in forest of khed bhoste ghat this incident came in youth dream ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  बाप रे..! कोकणातील घाटात पडलेला मृतदेह यायचा तरुणाच्या स्वप्नात, घटनास्थळी गेल्यावर पोलीसही हादरले

बाप रे..! कोकणातील घाटात पडलेला मृतदेह यायचा तरुणाच्या स्वप्नात, घटनास्थळी गेल्यावर पोलीसही हादरले

Sep 19, 2024 08:17 PM IST

bhoste ghat : भोस्ते घाटात पडलेल्या व्यक्तीचा मृतदेह शेकडो किमी लांब असलेल्या तरुणाच्या स्वप्नात जात होता. मृत व्यक्ती स्वप्नामध्ये जाऊन तरुणाकडे मदतीसाठी याचना करत होती. दररोज स्वप्न पडत असल्याने तरुणाने खेड पोलीस ठाणे गाठले व सर्व प्रकार पोलिसांना सांगितला.

भोस्ते घाटाचे संग्रहित छायाचित्र
भोस्ते घाटाचे संग्रहित छायाचित्र

मुंबई गोवा महामार्गावर खेड तालुक्यातील भोस्ते घाटाच्या जंगलात बुधवारी मानवी कवटी तसेच कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या घाटात पडलेल्या व्यक्तीचा मृतदेह शेकडो किमी लांब असलेल्या तरुणाच्या स्वप्नात जात होता. मृत व्यक्ती स्वप्नामध्ये जाऊन तरुणाकडे मदतीसाठी याचना करत होती. दररोज स्वप्न पडत असल्याने तरुणाने खेड पोलीस ठाणे गाठले व सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. पोलीस घटनास्थळी  गेल्यानंतर समोरचे दृष्य पाहून त्यांना धक्काच बसला. तरुणाला पडलेल्या स्वप्नातल्या गोष्टी खऱ्या ठरल्या होत्या. भोस्ते घाटामध्ये निर्जन ठिकाणी पोलिसांना कुजलेला मृतदेह सापडला. 

तरुणाकडून घटनेची माहिती मिळतात खेड पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी रस्त्याजवळच जंगलात मानवी कवटी आढळून आली व काही अंतरावर कुजलेला मृतदेह आढळला. जंगलात एका झाडाला दोरी लटकल्याचेही पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. घटनास्थळी पोलिसांना एक बॅग आणि रेनकोटही सापडला आहे. मात्र या ठिकाणी सापडलेला मृतदेह कोणाचा आहे? हे अद्याप स्पष्ट झाले नसून हा सापळा एका पुरुषाचा असल्याचे सांगण्यात येत आहे. 

३० वर्षीय तरुणाच्या स्वप्नात यायचा मृतदेह -

भोस्ते घाटात हा मृतदेह सापडण्याचं विचित्र कारणही समोर आलं आहे. योगेश पिंपळ आर्या या ३० वर्षीय तरुणाच्या स्वप्नात डोंगरात निर्जन ठिकाणी असलेला मृतदेह दिसला होता. योगेश सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीच्या आजगाव येथे राहतो. योगेशने पोलिसांना सांगितले की, आपल्याला वारंवार हेच स्वप्न पडत आहे. त्यानं सांगितले की, खेड रेल्वे स्टेशनसमोर एका डोंगरात पुरुषाचा मृतदेह असून तो माझ्या स्वप्नात येऊन मदतीसाठी याचना करत आहे. 

सुरुवातीला पोलिसांना तरुणाच्या दाव्यावर विश्वास बसला नाही. मात्र काय प्रकार आहे हे पाहण्यासाठी खेड पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन शोध घेतला. मात्र योगेशच्या स्वप्नात आलेल्या ठिकाणीच पोलिसांना मानवी कवटी आढळून आली. यानंतर पोलिसांनी दुर्गम डोंगराळ भागात शोध घेतला तेव्हा त्यांना कुजलेल्या अवस्थेतील मृतदेहही सापडला.

मृतदेह सापडलेला भाग योगेश आर्या राहतो त्या आजगावपासून शेकडो किमी दूर अंतरावर आहे. मात्र योगेशने आपल्या स्वप्नाबाबत जे सांगितलं ते हुबेहुब घाटात दिसलं. हा प्रकार पाहून स्थानिक नागरिकांसह पोलीसही अचंबित झाले. जंगलातील एका झाडाला दोरी आढळल्याने मृत व्यक्तीने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज लावण्यात येत आहे. मात्र हा मृतदेह नेमका कुणाचा आणि हा घातपात की आत्महत्या? याचा तपास पोलीस करत आहेत.

Whats_app_banner