मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Vedanta-Foxconn : देवेंद्र फडणवीसांची वेदांता प्रकल्पाबाबत पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Vedanta-Foxconn : देवेंद्र फडणवीसांची वेदांता प्रकल्पाबाबत पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Sep 15, 2022 08:56 AM IST

Vedanta Foxconn Semiconductor Project : वेदांता-फॉक्सकॉन प्रोजेक्ट गुजरातमध्ये हलवण्यात आल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याबाबत पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

Devendra Fadnavis On Vedanta Foxconn Semiconductor Project
Devendra Fadnavis On Vedanta Foxconn Semiconductor Project (Rahul Singh)

Devendra Fadnavis On Vedanta Foxconn Semiconductor Project : वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प ऐनवेळी महाराष्ट्रातून गुजरातला हलवण्यात आल्यानं राज्यात राजकीय वादंग पेटलं आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसनं याबाबत शिंदे-फडणवीस सरकारला धारेवर धरलं आहे. त्यातच आता विदेश दौऱ्यावर असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. या प्रकल्पासाठी महाराष्ट्राची निवड करण्यासाठी फडणवीसांनी अनिल अग्रवाल यांचं आभार मानलं असून स्वार्थासाठीच विरोधक टीका करत असल्याचा आरोप केला आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करून म्हटलं आहे की, वेदांता-फॉक्सकॉनच्या संलग्न प्रकल्पासाठी महाराष्ट्राची निवड करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल अनिल अग्रवाल यांचे मनःपूर्वक आभार. महाराष्ट्रात गुंतवणूक यावी यासाठी आम्ही कायमच स्पर्धात्मक आणि व्यवसायपूरक राहू. मला खेद होतो की केवळ राजकीय स्वार्थीपणासाठी अतिशय चुकीचे, नकारात्मक आणि निराधार दावे केले जात आहेत. पण असे करून ते केवळ त्यांच्या अकार्यक्षमतेचेच प्रदर्शन करीत आहेत, अशी टीका फडणवीसांनी विरोधकांवर केली आहे.

माझा या नेत्यांना प्रश्न आहे की, महाराष्ट्रात ३.५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक रिफायनरीच्या माध्यमातून येत असताना त्याला विरोध कुणी केला, हा प्रकल्प कुणी लांबविला?, स्वतः कार्यक्षम होण्यावर आधी लक्ष केंद्रीत करा, ना की अस्वस्थता आणि नकारात्मकतेवर, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर थेट हल्लाबोल केला आहे.

दरम्यान वेदांता ग्रुपचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी हा प्रकल्प गुजरातमध्ये नेण्यात येणार असल्याचं आधीच ठरलं होतं. महाराष्ट्र सरकारनं या प्रकल्पासाठी प्रयत्न केला होता, असं म्हटलं आहे. मागील दोन वर्षांपासून विविध राज्यांच्या सरकारशी आमची बोलणी सुरू होती. चांगली डील कोणत्या राज्याकडून मिळते, यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो.

शेवटी आम्हाला गुजरात सरकारकडून चांगली डील मिळाली. महाराष्ट्र हे महत्त्वाचं राज्य असून आमचा भविष्यात संलग्न प्रकल्प महाराष्ट्रात आणण्याचा प्रयत्न असेल, असंही अग्रवाल यांनी म्हटलं आहे.

IPL_Entry_Point