मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Devendra Fadnavis : शरद पवारांच्या राजीनाम्याची फडणवीसांनी उडवली खिल्ली, म्हणाले...

Devendra Fadnavis : शरद पवारांच्या राजीनाम्याची फडणवीसांनी उडवली खिल्ली, म्हणाले...

Atik Sikandar Shaikh HT Marathi
May 18, 2023 07:12 PM IST

Devendra Fadnavis News : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला होता, पक्षातील अनेक नेत्यांनी मनधरणी केल्यानंतर पवारांनी तो निर्णय मागे घेतला होता.

Devendra Fadnavis On Sharad Pawar
Devendra Fadnavis On Sharad Pawar (HT)

Devendra Fadnavis On Sharad Pawar : काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीत मोठं राजकीय नाट्य घडल्याचं पाहायला मिळालं. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाध्यपदाचा राजीनामा देत राजकारणातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी मनधरणी केल्यानंतर शरद पवारांनी निवृत्तीचा निर्णय मागे घेतला. त्यानंतर आता या प्रकरणावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत पवारांची खिल्ली उडवली आहे. 'माझाच पक्ष ठराव करेल आणि मग मीच राजीनामा मागे घेईल, टीआरपी घेण्याचं प्रशिक्षण पवारांकडून घ्यायला हवं', असं म्हणत फडणवीसांनी पवारांच्या राजीनामानाट्याची खिल्ली उडवली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलताना म्हणाले की, टीआरपी कसं घ्यायचं, हे आपल्याला शरद पवारांकडून शिकावं लागेल. त्यांनी स्वत:चा राजीनामा पक्षाकडे दिला, त्यानंतर पक्षातील अनेक लोकांनी त्यावर आक्रोश केला. पक्षाने ठराव केल्यानंतर मात्र पवारांनी राजीनामा मागे घेतला. पवारांनी ठाकरेंना कृतीतून सांगितलं की राजीनामा देतो म्हणणं आणि राजीनामा देणं यातला फरक काय आहे, असं म्हणत फडणवीसांनी राष्ट्रवादीला जोरदार टोला हाणला आहे. याशिवाय माझाच पक्ष ठराव करेल आणि मग मीच राजीनामा मागे घेईल, असं म्हणत फडणवीसांनी पवारांच्या राजीनामानाट्याची खिल्ली उडवली आहे.

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार हे विश्वासघाताने आलं होतं. ठाकरे सरकारचा विश्वासघातापासून ते विसर्जनापर्यंतचा प्रवास अनेकांनी पाहिला. त्यातील अनेक लोकांचा दाऊदपासून तर खंडणीखोर लोकांशी संबंध होता. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना काही तासच मंत्रालयात आले होते. पोलिसांच्या बदल्यांमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप करत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.

WhatsApp channel