मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Girish Bapat : गिरीशभाऊ नाहीत, या परिस्थितीचा सामना कसा करायचा कळत नाहीय; देवेंद्र फडणवीस भावूक
Girish Bapat and Devendra Fadnavis
Girish Bapat and Devendra Fadnavis (HT)

Girish Bapat : गिरीशभाऊ नाहीत, या परिस्थितीचा सामना कसा करायचा कळत नाहीय; देवेंद्र फडणवीस भावूक

29 March 2023, 15:57 ISTAtik Sikandar Shaikh

Girish Bapat Passed Away : सामान्य लोकांशी नाळ असलेलं उत्तुंग आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आपल्यातून निघून गेल्याची प्रतिक्रिया देत फडणवीसांनी गिरीश बापटांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

Girish Bapat Passed Away : भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं आज दुपारी दीर्घ आजारानं निधन झालं आहे. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यानंतर आता महाराष्ट्रासह देशभरातील अनेक राजकीय नेत्यांनी गिरीश बापट यांच्या निधनामुळं शोक व्यक्त केला आहे. त्यानंतर आता भाजपाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार गिरीश बापट यांच्या आठवणी जागवत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. गिरीश बापट हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांनी आजारातही लढवय्यासारखी झुंज दिली. आजारी असतानाही त्यांनी मतदारसंघावर लक्ष ठेवलं. बापटांचं निधन झाल्यामुळं भाजपची मोठी अपरिमित हानी झाली असून त्यांच्या कुटुंबियांच्या दुखात सहभागी असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक व्हिडिओ शेयर करत बापटांच्या आठवणी जागवल्या आहेत. त्यात ते बोलताना म्हणाले की, खासदार गिरीश बापट यांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू हा नेहमीच विकास राहिलेला होता. पक्षनिष्ठ राहताना पक्षापलिकडे त्यांनी अनेक लोकांशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण केले होते. पुणे महापालिका, विधानसभा आणि त्यानंतर लोकसभेत पोहचण्याच्या प्रवासात त्यांनी तळागाळातील लोकांकडे दुर्लक्ष होऊ दिलं नाही. भाजप-शिवसेना सरकारच्या काळात ते संसदीय कामकाज मंत्री होते. कोणताही प्रसंग आला तर त्यातून मार्ग काढण्याची हातोटी गिरीश बापट यांच्याकडे होती, असं म्हणत फडणवीसांनी बापटांच्या आठवणी जागवल्या. याशिवाय गिरीश बापट गेल्यामुळं परिस्थितीला कसं सामोरं जाऊ, हे समजत नाहीये, असं म्हणत देवेंद्र फडणवीस भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.

पुण्यातील अनेक भागांचा विकास करत असताना त्यांनी शेतकरी आणि कामगारांच्या विषयांकडे दुर्लक्ष होऊ दिलं नाही. महाराष्ट्रातील राजकारण करत असताना त्यांनी अमरावतीत शेती करण्याचं काम सुद्धा केलं होतं. भाजपच्या उभारणीत ते अग्रणी भूमिकेत होते. त्यामुळंच जनतेनं त्यांच्यावर भरभरून प्रेम केलं, राज्यातील एक उत्तुंग आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्व हरपलं आहे, असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गिरीश बापटांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. गिरीश बापट गेले आहेत, त्यामुळं आता परिस्थितीचा सामना कसा करू, हेच समजत नसल्याचं सांगताना फडणवीस काहीसे भावूक झाले होते.