राज्यात लाडकी बहीण योजनेची जोरदार चर्चा सुरु असून येत्या १७ ऑगस्ट रोजी योजनेचा पहिला हफ्ता महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. दरम्यान या योजनेबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. महिलांचे आधार खाते बँक खात्याशी संलग्न नाही ते संलग्न करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. सर्वांना पैसे मिळणार आहेत. काळजी करू नका. त्यामुळे ऑगस्टपर्यंत ज्यांचे अर्ज येतील त्यांना दोन महिन्यांचे देऊ. तर सप्टेंबरपर्यंत जे अर्ज येतील त्यांना तीन महिन्यांचे पैसे दिले जातील, अशी महत्त्वाची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी जळगावातील कार्यक्रमात दिली.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता येत्या १७ ऑगस्टला मिळणार आहे. मात्र आधार लिंक नसल्याने ज्या महिलांच्या बँक खात्यात १७ तारखेला पैसे येणार नाहीत, त्यांनी घाबरुन जाण्याची गरज नाही. त्यांनाही पहिल्या महिन्यापासून योजनेचा लाभ मिळणार आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, महिलांना मागे ठेवून कोणताच देश प्रगत होत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात महिला सक्षमीकरणाचे काम सुरू आहे. लाडकी बहीण योजनेवरुन कुणी काहीही म्हणाले तरी, महिला विकत घेता का? लाच देता का? नालायकांनो, तुम्हाला बहिणीचं प्रेम कळणार आहे की नाही, बहिणी जेव्हा प्रेम करतात तेव्हा भरभरून करतात. स्वत: उपाशी राहून भावाला पोटभर जेवायला घातलात. तुम्हाला संधी मिळाली तेव्हा तुम्ही का नाही दिले?,असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला.
राज्य सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांनी अनेक प्रश्न विचारले आहेत. ही योजना फक्त निवडणुकीपुरती असल्याची टीकाही केली. त्यातच महायुतीमधील आमदार रवी राणा आणि शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांनी योजनेबद्दल केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला होता. त्यावर देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं की, योजनेचे पैसे परत घेतले जाणार नाहीत. भाऊबीज परत घेतली जात नाही.
आम्हाला जर आशिर्वाद दिला नाही तर पैसे परत घेतले जातील, असं रवी राणा यांनी गंमतीने म्हटलं होतं. तर शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांनी डिसेंबरनंतर या योजनेतून विरोधकांची नावं काढून टाकली जातील, असं वक्तव्य केलं होतं. त्यावर देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
तुमचे सख्खे भाऊ येथे मंचावर बसले आहेत. सावत्र भावांपासून सावधान राहा. तुमचे सख्खे भाऊ तुम्हाला कुठल्याही योजनेपासून वंचित ठेवणार नाहीत, अशी मिष्किल टिप्पणी देवेंद्र फडणवीस यांनी केली. महिला सक्षम झाल्या तर महाराष्ट्राला कोणीच थांबवू शकणार नाही.
सावत्र भावांपासून सावधान राहा. कारण त्यांना तुम्हाला दिलेले पंधराशे रुपये पोटामध्ये दुखत आहे. काहीजण मानतात. पंधराशे रुपये परत घेतले जातील. मात्र या देशात भाऊबीज दिलेली परत घेतली जात नाही. माय माऊलींची योजना कुणाचा बाप बंद करू शकणार नाही.