Dattatray Gade Arrested: पुण्यासह अख्ख्या महाराष्ट्राला हादरवणाऱ्या स्वारगेट बसस्थानक बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपीला मध्यरात्री पुणे पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे. आरोपी हा घटनेनंतर त्याच्या शिरूर तालुक्यातील मूळ गावी गुणाट येथे लपून बसला होता. पुणे पोलिसांनी ड्रो, डॉग स्कॉड आणि इतर तंत्रज्ञानाच्या साह्याने आरोपीच्या मुसक्या आवळल्या. आरोपी दत्ता गाडेला पुण्यात आणण्यात आले असून त्याची ससूनमध्ये वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. त्याला आज ११ वाजता शिवाजीनगर कोर्टात हजर केले जाणार आहे.
दत्तात्रय गाडे याने मंगळवारी पहाटे साडे पाच वाजताच्या सुमारास फलटण येथे जाणाऱ्या एका २६ वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार केला होता. यानंतर आरोपी दत्तात्राय गाडे हा फरार झाला होता. तो शिरुर तालुक्यातील गुनाट गावात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांचे पथक गेल्या तीन दिवांपासून आरोपीचा शोध घेत होते. आघात त्याला अटक करण्यात आली आहे.
पुणे पोलिसांनी दत्तात्रय गाडेच्या शोधासाठी १०० पोलिसांचे पथक तयार केले होते. यात डॉग स्कॉडसह इतर यंत्रणांचा देखील समावेश होता. हे पथक दत्तात्रय गाडेचा शोध घेत होते.
पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी ताब्यात असून पुढील तपासासाठी स्वारगेट पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. आरोपी हा तीन दिवसांपासून गुनाटमध्ये लपला होता. आरोपीला पकडण्यासाठी गुणाट ग्रामस्थांनी पोलिसांना मोठी मदत केली. झोन २, क्राईमच्या टीम, ड्रोनची पथकं, आसपासच्या जिल्ह्यातील पोलीस पथकं आरोपीचा शोध घेत होती.
आरोपी दत्तात्रय गाडे हा नातेवाईकाच्या घरी गेला होता. दत्तात्रय गाडेला शरण येण्याचे आवाहन पुणे पोलिसांनी केले होते. तसेच त्याची माहिती देणाऱ्याला १ लाख रुपयांचं बक्षीस देखील ठेवण्यात आलं होतं. दत्तात्रय गाडे उसाच्या शेतात लपल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना होती. पोलिसांनी मध्यरात्री दीडच्या सुमारास त्याला अटक केली. गाडे रात्री बाराच्या सुमारास गावातील नातेवाईकाच्या घरी पाणी पिण्यासाठी आला होता. त्याला भूक लागली होती. तिथं दत्तात्रय गाडेनं जे काय केलं, त्याचा पश्चाताप झाल्याचं म्हटलं. याशिवाय गाडेनं प्रचंड भूक लागली असून काही तरी खायला द्या असं सांगितलं. नातेवाईकांनी काही खायला न देता फक्त पाण्याची बाटली दिली. त्यानंतर गाडे त्या घरातून निघून गेला. यानंतर नातेवाईकांनी यासगळ्या घटनाक्रमाची माहिती पोलिसांनी दिली.
ही माहिती मिळताच पुणे पोलिसांची टीम सक्रिय झाली. त्यांनी डॉग स्कॉड आणि ड्रोनने आरोपी गाडीचा उसाच्या शेतात शोध घेतला. अखेर तो पोलिसांच्या तावडीत सापडला. पुणे पोलिसांनी दत्तात्रय गाडेला जिथून अटक केली तिथं काही कपडे आणि गोधडी आढळून आली आहे.
संबंधित बातम्या