मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Shiv Sena: निष्ठेचा सागर उसळणार… दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेचा खणखणीत टीझर

Shiv Sena: निष्ठेचा सागर उसळणार… दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेचा खणखणीत टीझर

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Sep 30, 2022 12:33 PM IST

Shiv Sena Dasara Melava Teaser: अत्यंत आव्हानात्मक राजकीय परिस्थितीत होत असलेल्या यंदाच्या दसरा मेळाव्याचा व्हिडिओ टीझर शिवसेनेनं सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Shiv Sena Dasara Melava
Shiv Sena Dasara Melava

Shiv Sena Dasara Melava Teaser: राज्यातील राजकारणाच्या दृष्टीनं व शिवसेनेच्या दृष्टीनं महत्त्वाच्या असलेल्या यंदाच्या दसरा मेळाव्याकडं संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर व विधीमंडळ पक्ष एकनाथ शिंदे यांच्या मागे गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांची पुढील वाटचाल कशी असेल हे या मेळाव्यातून ठरणार आहे. शिवसेनेनं आज या मेळाव्याचा व्हिडिओ टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे.

पक्षातून फुटल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षावरच दावा केला आहे. त्यामुळं शिवसेनेच्या परंपरेप्रमाणे दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानावर घेण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र, न्यायालयानं सर्व बाजू तपासून उद्धव ठाकरे यांना शिवाजी पार्कवर मेळावा घेण्याची परवानगी दिली. त्यामुळं शिंदे गटाचा मेळावा वांद्रे येथील बीकेसीच्या मैदानावर होणार आहे. त्या मेळाव्याचा व्हिडिओ टीझर काल प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यानंतर आज शिवसेनेनं आपल्या मेळाव्याचा टीझर प्रसिद्ध केला आहे.

शिवसेनेच्या व्हिडिओ टीझरमध्ये आजपर्यंत शिवतीर्थावर झालेल्या मेळाव्याची दृश्ये दाखवण्यात आली आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे लाखोंच्या गर्दीला संबोधित करताना दिसत आहेत. ‘निष्ठेचा जनसागर उसळणार… भगवा अटकेपार फडकणार आणि महाराष्ट्राची ताकद दिसणार…’ अशी मेळाव्याची टॅगलाइन आहे. यातून शिवसेनेनं आपल्या मेळाव्याची दिशा स्पष्ट केली आहे. शिवसेनेतील फुटीच्या पार्श्वभूमीवर टीझरमध्ये निष्ठेचा उल्लेख आवर्जून करण्यात आला आहे. मेळाव्याला येणारे सगळे निष्ठावंत असं सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्याशिवाय अटकेपार भगवा फडकवण्याचा व महाराष्ट्राची ताकद दाखवण्याचा अर्थ हा दिल्लीतील सत्ताधाऱ्यांना आव्हान असा घेतला जात आहे. हा मेळाव ऐतिहासिक असेल, असा दावा टीझरमध्ये करण्यात आला आहे.

व्हिडिओ टीझरसोबत एक नेता, एक झेंडा, एक मैदान… ही शिवसेनेची टॅगलाइन देण्यात आली असून या ऐतिहासिक मेळाव्याचे साक्षीदार होण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

IPL_Entry_Point

विभाग