मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी मोठी घोषणा केली असून राज्यात आपली सत्ता आल्यास प्रत्येक जिल्ह्यात शिवाजी महाराजांचे मंदिर बांधणार असल्याचं वचन उद्धव ठाकरेंनी राज्यातील जनतेला दिलं आहे. शिवाजी महाराज हे आमचं दैवत आहे,प्रभू श्रीरामांची जशी मंदिरं आहेत,तसेच आमच्या शिवरायांची मंदिरं बांधण्यात येतील,अशी घोषणा उद्धव ठाकरेंनी केली.
या मेळाव्यातून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा महायुती सरकार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला. मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याच्या घटनेवरून उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारवर पुन्हा टीकास्त्र चढवलं.
उद्धव ठाकरे म्हणाले, 'प्रभू रामांसोबत वानर होते. त्यांना आम्ही देव मानतोच. शिवरायांनी महाराष्ट्रावर आलेले दैत्य मारले. ज्याप्रमाणे भाजप केवळ मतांसाठी छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारला. पुतळ्यामध्येही त्यांनी पैसे खाल्ले. मात्र आम्ही महाराजांचे पुतळा नुसते उभारत नाही,त्याची पूजा करतो. आमचं सरकार आल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधणार. आमच्या देवाऱ्यातही शिवरायांची पूजा होते. देशातील प्रत्येक राज्यात मंदिर झालं पाहिजे. मंदिरात त्यांचे सर्व शौर्य दाखवले पाहिजे.
उद्धव ठाकरे म्हणाले, मोदीजी आणि शिंदे सरकार शिवाजी महाराज म्हणजे मते मिळवण्याचं यंत्र नाही. इव्हीएमसारखा त्याचा वापर करु नका. तुम्हाला माझ्यावर किती टीका करायची ती करा.. महाराजांच्या मंदिराला जो विरोध करेल, त्याला महाराष्ट्र बघून घेईल. जशी रामाची पूजा होते तशीच आपल्या दैवताची पूजा कधी होणार. शिवाजी महाराजांचे नाही तर मोदींची मंदिरे उभारायची का?, असा सवालही ठाकरेंनी केला.
"राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आता १०० वर्ष पूर्ण होत आहेत. मला संघाबद्दल आदर आहे, मोहन भागवत यांच्याबद्दल आदर आहे, मात्र ते जे काही करत आहेत त्याच्याबद्दल आदर नाही. मला मोहन भागवत यांना विचारायचं आहे की, तुम्ही ज्या गोष्टी सांगत आहेत, त्या कोणासाठी सांगत आहात? कारण त्यांनी मध्ये सांगितलं की, हिंदूंनो स्वसंरक्षणासाठी एकत्र या. म्हणजे आता जे १० वर्षांपासून सत्तेत बसले आहेत, ते हिंदूंचं संरक्षण करू शकत नाहीत का? आम्हीच आमचं संरक्षण करायचं असेल तर तुमची गरज काय?" असा खोचक सवाल ठाकरे यांनी विचारला आहे.
दिल्लीवाल्यांच्या कितीही पिढ्या आल्या तरी त्यांना गाडून आपण भगवा फडकवणार आहोत. इथला प्रत्येक शिवसैनिक आजपासून बाळासाहेबांची मशाल बनवून या सरकारला आग लावल्याशिवाय राहणार नाही.