मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Saamana: भाजप नावाचा पक्ष महाराष्ट्रात होता हे पुढच्या पिढीला कळणारही नाही; शिवसेनेनं शंख फुंकला

Saamana: भाजप नावाचा पक्ष महाराष्ट्रात होता हे पुढच्या पिढीला कळणारही नाही; शिवसेनेनं शंख फुंकला

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Oct 05, 2022 03:16 PM IST

Shiv Sena vs BJP: भाजप हा महाराष्ट्राच्या इतिहासातून नष्ट झालेला दिसेल, असं भाकीत शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखातून वर्तवलं आहे.

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray

 Shiv Sena Slams BJP in Saamana Editorial: 'कोणी कितीही अपशकुन करू द्या, महाराष्ट्रात शिवसेनेचाच भगवा फडकत राहील. आज मुंबईवर शिवसेनेचं राज्य आहे. तुमच्या छाताडावर बसून पुन्हा मुंबई जिंकूच. पुढील निवडणुकीत कमळाबाईंची पुरती जिरणार आहे. भाजप हा महाराष्ट्राच्या इतिहासातून नष्ट झालेला दिसेल. भाजप नावाचा एक पक्ष महाराष्ट्रात होता व तो महाराष्ट्राच्या मुळावर आला होता, हे पुढच्या पिढीला कळणारही नाही,' अशी डरकाळी शिवसेनेनं फोडली आहे.

शिवसेनेतील उभ्या फुटीनंतर शिवतीर्थावर आज उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली दसरा मेळावा होत आहे. त्या आधीच ठाकरे यांनी शिवसेनेचं मुखपत्र 'सामना'तून युद्धाचा शंख फुंकला आहे. 'शिवसेना ही काही लेचापेचांची संघटना नाही. शिवसेना म्हणजे महाराष्ट्राची शिवशक्तीच आहे. ही शिवशक्ती गेली छप्पन्न वर्षे शिवतीर्थावर सीमोल्लंघनासाठी उसळत असते. अनेक लाटा आणि कपट-कारस्थानांशी टक्कर देत शिवतीर्थावरील हे सीमोल्लंघन सुरूच राहिलं आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दसऱ्याचाच दिवस का निवडला? त्याला विशेष महत्त्व आहे. मर्यादापुरुषोत्तम श्रीरामानं याच दिवशी दहा तोंडी रावणाचा वध केला होता. देवी दुर्गेने दहा दिवसांच्या घनघोर युद्धानंतर याच दिवशी महिषासुर नामक राक्षसाचा वध केला होता. या दिवशी सर्व अमंगल गोष्टींचा, कपट-कारस्थानांचा नाश होतो म्हणून विजयादशमीला आपल्या हिंदू संस्कृतीत मोठे महत्त्व आहे. यंदाचा दसराही अशा रावणांचा, महिषासुरांचा नाश करणार आहे, असा घणाघात अग्रलेखातून करण्यात आला आहे.

'महाराष्ट्रात व देशात सध्या अशा अहंकाराच्या वावटळी निर्माण झाल्या आहेत. महाराष्ट्रात आज सगळं काही विस्कटलेलं आहे. एक राज्य गेलं व दुसरं आलं म्हणजे सर्व काही व्यवस्थित झालं असं म्हणता येत नाही. बहुमतातलं सरकार पैसा आणि धमक्या देऊन पाडणं हे पुण्याच्या चांदणी चौकातील पूल पाडण्यासारखंच सोपं आहे असं काही लोकांना वाटत आहे, पण महाराष्ट्रातलं नवं सरकार महाराष्ट्र नामशेष करायलाच निर्माण झालं आहे, असा आरोप शिवसेनेनं केला आहे.

गुजरातचे ‘शहा’ हे मुंबई ताब्यात घेण्याची भाषा करतात. त्याआधी शिवसेनेला ‘पटक देंगे’ वगैरे झुंडशाहीची भाषा ते करीत होते. या ‘पटक’बाजीला ‘पुरून’ शिवसेना आज उभी आहे. गुजरातशी आमचा झगडा नाही. गुजरात महाराष्ट्राचे जुळे भावंडच आहे. नर्मदा शंकर नावाचे कवी सवाशे वर्षांपूर्वी होऊन गेले. ‘जय जय गर्वी गुजराथ’ असे काव्य त्याने लिहिले ते योग्यच आहे. त्या ‘गर्वी गुजरात’चे संरक्षण ‘बाबरी’ दंगलीनंतर शिवसेनेने केले. एक हिंदुत्व म्हणून शिवसेनेने ते कर्तव्य पार पाडले, पण त्या बांधवांच्या डोक्यात विष भिनविण्याचे काम गेल्या काही काळापासून सुरू आहे. ते महाराष्ट्र आणि गुजरातलाच नाही, तर देशालाच धोकादायक आहे, हे दिल्लीश्वरांनी लक्षात घेतले पाहिजे.

विजय नक्की आहे!

दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेला शिवाजी पार्क म्हणजे बाळासाहेबांचे शिवतीर्थ मिळू नये यासाठी कारस्थाने झाली. शेवटी न्यायालयाने न्याय केला. ज्या शिवाजी पार्कवरून शिवसेनाप्रमुखांनी हिंदुत्वाचे, मराठी अस्मितेचे रणशिंग फुंकले, महाराष्ट्र जागा केला, एक बलाढ्य संघटन उभं केलं त्या शिवतीर्थावरच शिवसेनेविरुद्ध मराठी माणसाला लढविण्याचं पाप भाजपच्या कमळाबाईंनी केलं. मात्र आता शिवसेनेच्या पुढील लढ्याच्या नव्या पर्वाला सुरुवात पुन्हा एकदा शिवाजी पार्कच्याच या रणमैदानावरून होत आहे ही मोठी योगायोगाची गोष्ट आहे. संयुक्त महाराष्ट्राचा लढा याच मैदानावर सुरू झाला आणि याच मैदानावर पूर्ण झाला. शिवसेनेचं प्रत्येक रणशिंग बाळासाहेबांनी याच मैदानावर फुंकलं. आता शिवसेनेच्या नव्या लढय़ाची नांदी याच ठिकाणी होत आहे. आज शिवतीर्थावर विचारांचं सीमोल्लंघन होईल. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सच्चा शिवसैनिक चालत, धावत, मिळेल त्या वाहनानं शिवतीर्थाकडं निघाला आहे. रणमैदान सज्ज होत आहे. ‘खोके’वाल्यांचा अधर्म या निष्ठेपुढं कसा टिकेल? शिवतीर्थाच्या रणमैदानावर धर्म आहे! त्यामुळं जय नक्की आहे, असा विश्वास अग्रलेखातून व्यक्त करण्यात आला आहे.

WhatsApp channel