मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Dasara Melava: दसरा मेळाव्याच्या बसेससाठी शिंदे गटानं १० कोटींची कॅश कुठून आणली?; ईडी चौकशीची मागणी
BKC Dasara Melava
BKC Dasara Melava

Dasara Melava: दसरा मेळाव्याच्या बसेससाठी शिंदे गटानं १० कोटींची कॅश कुठून आणली?; ईडी चौकशीची मागणी

04 October 2022, 17:47 ISTGanesh Pandurang Kadam

BKC Dasara Melava: दसरा मेळाव्याला येत असलेल्या बस गाड्यांसाठी शिंदे गटानं एसटी महामंडळाला १० कोटी रुपयांची रोख रक्कम दिली आहे. त्यावरून ईडी चौकशीची मागणी होत आहे.

शिवसेनेच्या दोन गटांपैकी कोणाच्या दसरा मेळाव्याला जास्त गर्दी होणार यावरून दावे-प्रतिदावे सुरू असतानाच आता वेगळीच माहिती समोर येत आहे. बीकेसी येथील दसरा मेळाव्यासाठी एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांनी शेकडो बसेस बुक केल्या असून त्यासाठी एसटी महामंडळाला १० कोटी रुपये रोख दिले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर रोकड कुठून आली, याची चौकशी करण्याची मागणी काँग्रेसनं ईडी व प्राप्तिकर विभागाला केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाकडून मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च केला जात आहे. त्याकडं काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी लक्ष वेधलं आहे. 'मेळाव्यात शक्तीप्रदर्शन करण्यासाठी राज्यभरातून बसेसच्या माध्यमातून लोकांना मुंबईत आणलं जात आहे. मेळावा यशस्वी करण्यासाठी सर्व नियम धाब्यावर बसवले जात आहेत. विशेष म्हणजे दसरा मेळाव्यासाठी एसटी बसेस बुक करताना शिंदे गटानं १० कोटी रुपये रोख दिल्याचं समजतं आहे, ही रक्कम शिवसेना पक्षाच्या खात्यातून दिली आहे का? नसेल तर ही रक्कम कुठून आणली? १० कोटींचा रोख व्यवहार कसा केला? दोन लाख जेवणाची पॅकेट्स तयार करण्यात आल्याचं समजतं, यासाठी कोट्यवधींचा खर्च कोणी केला? ते पैसे कुठून आले. १० कोटी रुपये मोजण्यास २ दिवस लागल्याच्या बातम्याही प्रसारित झाल्या आहेत. शिंदे यांच्या पक्षाची अद्याप अधिकृत नोंदणीही झालेली नाही, मग हा पैसा कोणत्या खात्यातून आला. हे मनी लाँड्रिंग तर नाही ना? याची चौकशी व्हायला हवी, असं लोंढे म्हणाले.

संजय राऊत, अनिल देशमुखांचा दिला दाखला

शिवसेना खासदार संजय राऊत यांना ५० लाखांच्या एका व्यवहारासाठी ईडी चौकशी करून मनी लाँडरिंगच्या आरोपाखाली तुरुंगात टाकते. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मनी लाँडरिंगचा गुन्हा दाखल करून जेलमध्ये टाकलं जातं, मग १० कोटी रुपये बसेससाठी आले कुठून याची चौकशी करणं महत्त्वाचं वाटत नाही का? इतर खर्चाचीही चौकशी होणं गरजेचं आहे. ईडी व आयकर विभागानं याची दखल घेऊन चौकशी करावी, त्यांनी चौकशी करण्यास टाळाटाळ केली तर काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही ईडी व आयकर विभागाकडे रितसर तक्रार करू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.