मोठी बातमी..! राज्यसभेसाठी महायुतीकडून धैर्यशील पाटील आणि नितीन पाटील यांना उमेदवारी जाहीर-darhysheel patil and nitin patil has been announced as rajya sabha candidate by mahayuti ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मोठी बातमी..! राज्यसभेसाठी महायुतीकडून धैर्यशील पाटील आणि नितीन पाटील यांना उमेदवारी जाहीर

मोठी बातमी..! राज्यसभेसाठी महायुतीकडून धैर्यशील पाटील आणि नितीन पाटील यांना उमेदवारी जाहीर

Aug 20, 2024 08:54 PM IST

rajya sabha Election : राज्यातील रिक्त झालेल्या राज्यसभेच्या दोन जागांसाठी निवडणूकजाहीर झाल्यानंतरया दोन जागांवर कोण लढणार? याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती

राज्यसभेसाठी महायुतीकडून  उमेदवार जाहीर
राज्यसभेसाठी महायुतीकडून  उमेदवार जाहीर

Rajya sabha Election : राज्यातील राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील दोन जागांसह नऊ राज्यांतील राज्यसभेच्या रिक्त १२ जागांसाठी ३ सप्टेंबर रोजी पोटनिवडणूक घेण्यात येत आहेत. त्यानुसार भाजपने रायगड जिल्ह्यातील धैर्यशील पाटील (Darhysheel patil) यांना तर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून साताऱ्यातून नितीन पाटील (nitin patil) यांना राज्यसभेवर पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उद्या बुधवारी नितीन पाटील राज्यसभेसाठीचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. महायुतीकडून दोन्ही जागा बिनविरोध करण्याचा प्रयत्न असणार आहे.

भाजपने धैर्यशील पाटील यांना राज्यसभेची  उमेदवारी जाहीर केली आहे.  गेल्याच वर्षी शेतकरी कामगार पक्षाचे नेते धैर्यशील पाटील भाजपमध्ये सामील झाले होते. आता दुसऱ्याच वर्षी पाटील यांना राज्यसभेची उमेदवारी मिळाली आहे. भाजपाने राज्यसभेसाठी नऊ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात आसामधून मिशनरंजन दास, रामेश्वर तेली. बिहारमधून मनन कुमार मिश्र, हरियाणामधून किरण चौधरी, मध्य प्रदेशमधून जॉर्ज कुरियन, महाराष्ट्रातून धैर्यशील पाटील, ओडिसा येथून ममता मेहंता, राजस्थान मधून सरदार रवनीत सिंह बिट्टू, त्रिपुरा येथून राजीब भट्टाचार्जी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. 

राज्यातील रिक्त झालेल्या राज्यसभेच्या दोन जागांसाठी निवडणूक जाहीर झाल्यानंतर या दोन जागांवर कोण लढणार? याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. भाजपाचे नेते  पीयूष गोयल आणि उदयनराजे भोसले यांची लोकसभेवर निवड झाल्याने या दोन जागा रिक्त झाल्या आहेत. या दोन्ही जागांवर भाजपा आपले उमेदवार देणार की त्यापैकी एक जागा मित्रपक्षाला देणार, याबाबत चर्चा सुरू होत्या. दरम्यान, आता भाजपाने यादी जाहीर करत एकाच जागेवर उमेदवार जाहीर करत एक जागा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीला सोडली आहे. भाजपकडून रायगडच्या धैर्यशील पाटलांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. 

राष्ट्रवादीकडून नितीन पाटील यांना संधी -

उदयनराजेंसाठी सातारा लोकसभा जागेववरून माघार घेणाऱ्या नितीन पाटील यांना राज्यसभेवर घेण्याचा शब्द अजित पवार यांनी दिला होता. हा शब्द अजित पवार यांनी पाळला असून त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. नितीन पाटील मुंबईला दाखल झाले असून महायुतीच्या सर्व नेत्यांच्या उपस्थितीत बुधवारी मुंबई विधान भवनात अर्ज भरण्यात येणार आहे. ही निवड बिनविरोध करण्यासाठी महायुतीची रणनिती असल्यामुळे धैर्यशील पाटील व नितीन पाटील खासदार होणार, हे जवळपास निश्चित झाले आहे.