महाराष्ट्रात मविआच्या ३१ जागांवरील विजयात दलित, आदिवासी, मुस्लिम मतांचा मोठा वाटा; आकडेवारीवरून स्पष्ट-dalit tribal muslim votes helped maha vikas aghadi get 31 seats in maharashtra ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  महाराष्ट्रात मविआच्या ३१ जागांवरील विजयात दलित, आदिवासी, मुस्लिम मतांचा मोठा वाटा; आकडेवारीवरून स्पष्ट

महाराष्ट्रात मविआच्या ३१ जागांवरील विजयात दलित, आदिवासी, मुस्लिम मतांचा मोठा वाटा; आकडेवारीवरून स्पष्ट

Jun 10, 2024 05:02 PM IST

महाराष्ट्रात महाविकास आघाडीला ३१ जागा मिळाल्या. यात राज्यातील मुस्लिम, दलित आणि आदिवासी मतदारांचा मोठा वाटा होता, असं आकडेवारीवरून स्पष्ट झालं आहे.

महाराष्ट्रात मविआच्या ३१ जागांवरील विजयात दलित, आदिवासी, मुस्लिम मतांचा मोठा वाटा; आकडेवारीवरून स्पष्ट
महाराष्ट्रात मविआच्या ३१ जागांवरील विजयात दलित, आदिवासी, मुस्लिम मतांचा मोठा वाटा; आकडेवारीवरून स्पष्ट

 

 

सुरेंद्र गांगण

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपने संपूर्ण जोर लावूनही काँग्रेस, शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या पक्षांचा समावेश असलेल्या महाविकास आघाडीला तब्बल ३१ जागांवर विजय मिळाला. या ३१ जागांवर प्रामुख्याने दलित, मुस्लिम आणि आदिवासी समाजाती मते मविआकडे गेल्याचे आकडेवारीवरून दिसून आले आहे. निवडणूक आयोगाच्या विधानसभा मतदारसंघनिहाय आकडेवारीवर नजर टाकल्यास राज्यात अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या २९ विधानसभा मतदारसंघांमध्ये बहुतांश ठिकाणी मविआच्या उमेदवाराला आघाडी मिळाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच राज्यात अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या २४ मतदारसंघ आणि मुस्लिमबहुल ३० हून अधिक मतदारसंघांमध्येही महाविकास आघाडीचे विजयी झालेले उमेदवार आघाडीवर असल्याचे स्पष्ट झाले आहे.

महाराष्ट्रातील २८८ विधानसभा मतदारसंघांपैकी ३० हून अधिक मतदारसंघात मुस्लिम मतदारांचा कल प्रभावी ठरतो. यात प्रामुख्याने मुंबईतील कुर्ला, मानखुर्द, अणुशक्ती नगर, वांद्रे (पूर्व), भायखळा, मुंबादेवी आणि मालाड (पश्चिम) या विधानसभा मतदारसंघात १८ लाखांहून अधिक मुस्लिम मतदार आहेत. मानखुर्द विधानसभा मतदारसंघात शिवसेना (उबाठा)चे मुंबई (ईशान्य) लोकसभेचे विजयी उमेदवार संजय दिना पाटील यांना ७५ टक्क्यांहून अधिक मते मिळाल्याचे दिसून येते. तर दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात असलेल्या मुस्लिमबहुल भायखळा मतदारसंघात शिवसेना (उबाठा)चे अरविंद सावंत यांना आघाडी मिळाली आहे. भायखळा विधानसभा मतदारसंघात अरविंद सावंत यांना ८६,८८३ मते तर शिवसेना (शिंदे) गटाच्या उमेदवार यामिनी जाधव यांना ४०,८१७ मते मिळाली आहे. तसेच मुंबादेवी मतदारसंघात अरविंद सावंत यांना ७७, ४६९ मते तर यामिनी जाधव यांना ३६,६९० मते मिळाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. मुंबईतील इतर मुस्लिमबहुल विधानसभा मतदारसंघातही हीच स्थिती होती.

बीड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार)चे विजयी उमेदवार बजरंग सोनावणे यांना १,३९, ९१७ मते मिळाली तर भाजपच्या पंकजा मुंडे यांना ७७,६०५ मिळाली आहे. तर धुळे लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या मालेगाव (मध्य) विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या विजयी शोभा बच्छाव यांना १ लाख ९९ हजार मतांचा आघाडी मिळाली, तर भाजप उमेदवार, माजी केंद्रीय मंत्री सुभाष भामरे यांना केवळ ४,५४२ मते मिळाल्याचे दिसून येते. परभणी लोकसभा मतदारसंघातील परभणी शहरात शिवसेना (उबाठा)चे उमेदवार संजय जाधव यांना १ लाख ८ हजार ३७४ मतांची आघाडी मिळाली असून त्यांचे प्रतिस्पर्धी, महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांना ६५,९७४ मते मिळाल्याची दिसून येते. हातकणंगले लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात शिवसेना (शिंदे) गटाचे विजयी उमेदवार धैर्यशील माने यांना ५८,९४४ तर शिवसेना (उबाठा)चे उमेदवार सत्यजित पाटील यांना ७६,४२५ मतांची आघाडी मिळाली आहे.

मुस्लिम मतांचे विभाजन टळल्याने मविआला यश

ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष शब्बीर अन्सारी म्हणाले, 'गेल्या तीन दशकांमध्ये काँग्रेसपासून दूर राहिलेल्या मुस्लिम समाजाने आता काँग्रेसला सामूहिक मतदान केले आहे. महाराष्ट्रात किमान ६० विधानसभा मतदारसंघात मुस्लिम समाज लक्षणीय आहे. यावेळी मुस्लिमांनी काँग्रेस किंवा कॉंग्रेसच्या मित्रपक्षांना एकत्रित येऊन मतदान केले. समाजवादी पक्ष, एमआयएम किंवा वंचित बहुजन आघाडीला मतदान केल्यास मुस्लिम मतांचे विभाजन होईल, याची दक्षता घेतली. सध्याच्या सरकारकडून लक्ष्य केले जाण्याची भीती या समाजाला वाटत होती आणि त्यांनी विरोधात मतदान करण्याचे ठरवले होते. मतदान आणि मतदार नोंदणीसाठी जनजागृती कार्यक्रमांनी यात महत्त्वाची भूमिका बजावली, असं अंसारी म्हणाले.

गडचिरोली, नंदुरबार, नाशिक, पालघर आणि अमरावती या आदिवासीबहुल जिल्ह्यांमध्ये आदिवासींसाठी विधानसभेचे २४ राखीव मतदारसंघ आहेत. यापैकी १५ विधानसभा मतदारसंघांत महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान झाले, तर उर्वरित नऊ मतदारसंघांत सत्ताधारी महायुती आघाडीच्या उमेदवारांना विजय मिळाल्याचे दिसून येते. गडचिरोली आणि नंदुरबारमध्ये आदिवासी मतदार स्पष्टपणे काँग्रेसकडे झुकलेला दिसतो, असे भाजपच्या एका आदिवासी नेत्याने सांगितले. राज्यघटनेतील कथित बदल आणि मणिपूरमधील आदिवासींवरील अत्याचारांमुळे हा समाज भाजपकडून दूर गेला असल्याचे दिसून येते.