Dairy farmers strike: दुधाला प्रती लिटर ४० रुपये भाव न मिळाल्यास २८ जूनपासून दूध उत्पादकांचे राज्यभर आंदोलन
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Dairy farmers strike: दुधाला प्रती लिटर ४० रुपये भाव न मिळाल्यास २८ जूनपासून दूध उत्पादकांचे राज्यभर आंदोलन

Dairy farmers strike: दुधाला प्रती लिटर ४० रुपये भाव न मिळाल्यास २८ जूनपासून दूध उत्पादकांचे राज्यभर आंदोलन

Jun 27, 2024 07:08 PM IST

Dairy farmers strike in Maharashtra - दुधाला किमान ४० रुपये प्रती लिटर भाव न मिळाल्यास उद्या, २८ जूनपासून आंदोलन करण्याचा इशारा राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या संघटनेनं राज्य सरकारला दिला आहे.

दुधाला प्रती लिटर ४० रुपये भाव न मिळाल्यास दूध उत्पादकांचे आंदोलन
दुधाला प्रती लिटर ४० रुपये भाव न मिळाल्यास दूध उत्पादकांचे आंदोलन

दुधाला किमान ४० रुपये प्रती लिटर भाव न मिळाल्यास उद्या, २८ जूनपासून आंदोलन करण्याचा इशारा राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या संघटनेनं राज्य सरकारला दिला आहे. वर्षभर सातत्याने तोटा करावा लागल्याने सहन करावा लागत असल्याने दूध उत्पादकांमध्ये तीव्र नाराजी असून राज्यात या नाराजीचा उद्रेक आंदोलनांच्या निमित्ताने पुढे येत आहे. दूध उत्पादकांनी ठिकठीकाणी उत्स्फुर्तपणे रास्तारोको, उपोषणे, निदर्शने सुरु केली आहेत. सरकारने या सर्व आंदोलनांची दखल घ्यावी व दूध उत्पादकांच्या मागण्या मान्य कराव्यात असे आवाहन दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती सरकारला केले आहे. 

दूध उत्पादकांच्या विविध मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी २८ जून पासून राज्यात अधिक संघटितपणे आंदोलन सुरु करण्यात येणार आहे. किसान सभा तसेच विविध शेतकरी संघटना, कार्यकर्ते व आंदोलकांमध्ये समन्वय स्थापित करून आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे.

गेले वर्षभर दूध दराबाबत शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीची भावना आहे. प्रति लिटर १० ते १५ रुपयांचा तोटा सहन करून दूध उत्पादक शेतकरी दूध घालत आहेत. दूध उत्पादनातील वाढता तोटा सहनशक्तीच्या पलीकडे गेला असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. राज्य सरकारने ही परिस्थिती लक्षात घेऊन नागपूर अधिवेशनात जाहीर केल्याप्रमाणे दुधाला किमान प्रती लिटर ४० रुपये दर द्यावा, बंद केलेले दूध अनुदान पुन्हा सुरु करावे, वाढता उत्पादनखर्च व तोटा पाहता अनुदानात वाढ करून ते प्रति लिटर १० रुपये करावे तसेच अनुदान बंद काळात दूध घातलेल्या शेतकऱ्यांना या काळातील अनुदान द्यावे या मागण्या दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने केल्या आहेत.

दुधाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी तत्कालीन उपाय योजनांच्या बरोबरच दीर्घकालीन दूध धोरण तयार करण्याची नितांत आवश्यकता आहे. दुधाला उत्पादन खर्चावर आधारित योग्य भाव मिळावा यासाठी उसाप्रमाणे दुधालाही एफ.आर.पी. व रेव्हेन्यू शेअरिंगचे धोरण लागू करावे, दुग्ध मूल्य आयोगाची स्थापना करावी, पशुखाद्य व पशु औषधांचे दर नियंत्रित करावेत, खाजगी व सहकारी दूध संघाना लागू होईल असा लुटमार विरोधी कायदा करावा, दूध भेसळ रोखावी, अनिष्ट ब्रँडवार रोखण्यासाठी एक राज्य एक ब्रँड धोरणाचा स्वीकार करावा, मिल्कोमीटर व वजन काट्यात होणारी दूध उत्पादकांची लुटमार थांबविण्यासाठी तालुका निहाय स्वतंत्र तपासणी निरीक्षकांची नियुक्ती करावी, शासकीय अनुदानातून पशु आरोग्य विमा योजना सुरु करावी या मागण्या दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने केल्या आहेत. 

२८ जून पासून सुरु होणाऱ्या या आंदोलनाची व्याप्ती राज्यभर विस्तारणार असून राज्य सरकारने या पार्श्वभूमीवर दुध उत्पादकांचा अधिक अंत पाहू नये असे आवाहन संघर्ष समितीतर्फे डॉ. अशोक ढवळे, डॉ. अजित नवले, उमेश देशमुख, सतीश देशमुख, अशोक ढगे, जोतीराम जाधव, नंदू रोकडे, दादा गाढवे, राजकुमार झोरी यांनी केले आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या