संपूर्ण राज्यात काल (मंगळवार) दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा झाला. मात्र दहीहंडी फोडताना थरावरून कोसळून गोविंदा जखमी झाल्याच्या घटना राज्यातील अनेक शहरात घडल्या होत्या. केवळ मुंबईत काल थरावरून कोसळून २४५ गोविंदा जखमी झाले आहेत. त्यातच जळगावमधून एक दु:खद बातमी समोर येत असून दहीहंडी फोडताना थरावून कोसळून गंभीर जखमी झालेल्या गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे ही घटना घडली आहे. नितीन चौधरी असे मृत गोविंदाचे नाव आहे.
दरम्यान या घटनेनंतर काँग्रेसचे पाचोरा तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी मृत गोविंदा नितीन चौधरी यांच्या कुटूंबास मुख्यमंत्री सहायता निधीमधून तातडीने मदत देण्याची मागणी केली आहे.
मंगळवारी गोपाळकालानिमित्त जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. पाचोरा शहरातील स्टेशन रोडवरील रिक्षा स्टॉपवर रिक्षा चालकांनी दहीहंडीचे आयोजन केले होते. मंगळवारी रात्रीच्या सुमारास दहीहंडी फोडण्यासाठी नितीन चौधरी हा रिक्षा चालक गोविंदाने पुढाकार घेतला. मात्र दहीहंडी फोडण्याच्या प्रयत्नात तो वरच्या थरावरून कोसळला होता. तो डोक्यावर कोसळल्याने गंभीर जखमी झाला होता.
त्याला तत्काळ रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचारा दरम्यान त्याचा बुधवारी (२८ ऑगस्ट) मृत्यू झाला. नितीन चौधरी हा रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. घरातील कर्ता पुरुष गेल्याने कुटुंबावर मोठा आघात झाला असून त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे त्याच्या कुटूंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून तातडीने मदत देण्याची मागणी करण्यात येत आहे.
मुंबईत दहीहंडीच्या उत्सवाला गालबोट लागले असून मानवी मनोऱ्यावरून कोसळल्याने काही गोविंदा जखमी झाले आहेत. मुंबईत काल दहिहांडी उत्सवादरम्यान एकूण २४५ गोविंदा जखमी झाल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काही जणांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. काही ठिकाणी आठ थर तर काही ठिकाणी ९ थर रचून सलामी देण्यात आली. यामध्ये थर कोसळल्याने अनेक गोविंदा जखमी झाले आहेत.
संबंधित बातम्या